SHRI LAXMINARAYAN TEMPLE – WALAVAL

कुडाळ शहरापासुन १५ कि.मी. अंतरावर असलेलं श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे हेमाडपंथी वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. गर्द वनराईने नटलेलं वालावल गाव आणि मंदिरालगतचा सुंदर व शांत तलाव मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो. हे मंदिर सुमारे आठशे वर्षापूर्वेचे असल्याचे जाणकार सांगतात. या मंदिराचं बांधकाम चौदाव्या शतकात सूर्यभान आणि चंद्रभान प्रभुदेसाई या महापराक्रमी बंधूंनी केले. त्यांची स्मारके श्री लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील दीपमाळांजवळ कल्याण पुरूष म्हणुन उभी आहेत. हे मंदिर पूर्वाभिमुख असुन याची रचना त्रिस्तरीय आहे. मुख्य देवळी पुरातन असून या मंदिराच्या बांधकामामध्ये पूर्णतः सागवानाचा वापर केला आहे. सभामंडपातील त्याकाळी बसवलेली लादी कारागीरांचे कसब दाखविणारी आहे. या अतिप्राचीन मंदिरात असलेले कोरीवकामाचे स्तंभ देखणे असून मंदिरात अतिशय सुंदर आणि देखणी अशी श्री लक्ष्मीनाराययाची मूर्ती आहे. मंदिराचा सभागार प्रशस्त असुन येथील दगडी खांबावर व तुळईवरही कोरीवकाम केलेले आढळते. मुख्य दरवाजा उंचीला कमी असून, त्यावर अप्रतिम कमळांच्या फुलांचे कोरीवकाम केलेले आहे. मंदिराच्या समोरील द्वारपाल तसेच डोक्यावरील विष्णूची मूर्तीही प्रेक्षणीय आहे. मंदिर सभोवतालचा परिसर पण निसर्गरम्य आहे. मंदिरा शेजारी एक तलाव आहे.त्यात फुललेली कमल पुष्पे रसिकाना मोहिनी घालतात. असे म्हणतात गावातल्या माणसाला त्या तलावापासून काही भीती नाही.पण बाहेरच्या माणसाना मात्र तो हमखास ओढून नेतो.असे काही प्रकार झाले आहेत.त्यामुळे बाहेरील व्यक्ती तलावात सहसा उतरत नाही.रामनवमीला येथे नऊ दिवस यात्रा असते. वालावल गावची कोणतीही व्यक्ती पंढरपूरची वारी करत नाही, असा गावचा रिवाज आहे.

श्री देव नारायण देवस्थान जागृत असल्याचा तेथील लोकांचा अनुभव आहे. देवळातील नारायण मूर्तीच्या गाभाऱ्यात पूर्वी कधी ‘सिंहनाद’ होत असल्याचे सांगतात. देवालयाच्या महाव्दारावरील कोरीव काम व आतील सभामंडपाचे सहा पाषाणी स्तंभ प्राचीन शिल्पकलेचा अत्युत्क्रुष्ट नमुना आहे.या खांबांची उंचीसुमारे साडेसहा फूट असून त्याचा मध्यवर्ती घेर ही जवळजवळ तेवढाच आहे. प्रत्येक खांबांच्या मध्यावर देवादिकांच्या सुंदर मूर्ती वर्तुळाकार कोरलेल्या आहेत. देवालयाची रचना दरवाज्यावरील आणि खांबावरील नवाग्रहादी देवतांच्या मूर्ती व कोरीव काम अत्यंत सुबक व मनोहर असून त्यांचे बारकाईने संशोधन करण्यासारखे आहे.

SHRI LAXMINARAYAN TEMPLE – WALAVAL

वालावल गावाचे ६ व्या शतकातील नाव बल्लावल्ली होते. गावाला लागून असलेले दाट जंगलांनी वेढलेले डोंगर, दर्‍या, गावाच्या उत्तरेकडून वहाणारी कर्ली नदी यामुळे प्राचीन काळापासून हे गाव एखाद्या वनदुर्गाप्रमाणे दुर्गम होते. त्यामुळे प्राचीन काळापासून राजेरजवाडे, या भागातील अधिकारी यांनी या गावाचा आसरा घेतलेला आहे. इ.सनाच्या ११ व्या शतकात शिलाहार राजांचे या ठिकाणी वास्तव्य होते. नंतर विजयनगरच्या काळापासून बहामनी व नंतर विजापूरच्या राजवटी पर्यंत प्रभूदेसाई घराण्याकडे कुडाळ महालाची जहागिरदारी होती. त्यांचे वास्तव्यही वालावल गावात होते. इ.सनाच्या ११ व्या शतकात मुसलमानांनी गोवा काबीज केला. त्यावेळी गोव्यातील पेडणे महालातील हरमळ गावातून श्री देव नारोबाची मुर्ती ब्राम्हणांनी वालावल गावात आणली. त्यावेळी चंद्रभान व सूर्यभान हे वीर पुरुष याठिकाणी अधिकारी होते. त्यांनी नारायणाचे मंदिर बांधून वालावली गावाचे उत्पन्न मंदिराला दिले. मंदिरा समोरील दिपमाळांच्या मध्ये मंदिराची स्थापना करणार्‍या कल्याण पुरुषाची देवळी बांधण्यात आली आहे. लक्ष्मी नारायण मंदिराच्या स्थापनेचा काळ साधारण इ.स.१३५० ते १४०० च्या दरम्यान असावा. मंदिराची बांधणी चालुक्य पध्दतीची असून कालौघात मुळ मंदिराच्या बांधकामात भर पडत गेली. विलोभनीय सृष्टीसौंदर्य, मनाला भुरळ घालणारा इथला नयनरम्य परिसर, जीवनाला जलसंजीवनी देणारी कर्ली नदी ! आणि या अशा मांगल्याची, पवित्रतेची जपणूक करणारे श्री लक्ष्मीनारायण मंदिर नजिकच श्रीदेव रवळनाथ, उंचावर वसलेले व तेथून सुमारे तीन-चार कि.मी. लांब असलेले माऊली मंदिर! सारेच अविस्मरणीय!
दंतकथेनुसार श्री नारोबा व माऊली हे भाऊबहीण तिर्थयात्रेला चालले होते. वाटेत वालावल गावी कुपीच्या डोंगर पठारावर (सड्यावर) माऊलीला तहान लागली म्हणुन श्री नारोबा पाणी आणण्यासाठी दरीत (गावात) उतरला. तेथील घरातून वड्याचा स्वयंपाक चालू होता. त्या वासाने नारोबाची भूक उफाळून आली. माऊलीला विसरून तो तिथेच जेवला. पोट भरल्यावर त्याला माऊलीची आठवण झाली. पाणी घेऊन भीत भीतच तो डोंगरावर गेला. नारोबा वेळेवर पाणी घेऊन आला नाही म्हणून माऊलीला खुप राग आला होता. रागाच्या भरात तिने नारोबाच्या श्रीमुखात दिली. (श्री नारोबाच्या मुर्तीच्या गालावरील खडडा याची खुण म्हणून दाखवतात.) या भांडणामुळे पुढे न जाता माऊली तिथेच राहीली.माऊलीचे देवालय पर्वती म्हणून सड्यावर बांधलेले आहे. (या ठिकाणी नवरात्रोत्सव होतो.) श्रीनारायणाचे मंदिर गावात आहे. दरवर्षी वैकुंठ चतुर्दशीस नारोबा, माऊलीस पाणी घेऊन जातो (श्रीनारायणाची पालखी पाणी घेऊन माऊली मंदिरात जाते.)

 

SHRI LAXMINARAYAN TEMPLE – WALAVAL https://youtu.be/vhnpL7LZG-g

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *