SATERI DEVI – JAL MANDIR, BILWAS
नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेली मालवण तालुक्यातील बिळवस येथील श्री सातेरी देवी जलमंदिर बिळवस येथील सातेरी देवीचे मंदिर पूर्णपणे पाण्यात असून पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.

सातेरी देवीचे मंदिर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यात असलेल्या मसुरे गावातल्या बारा वाडय़ांची ग्रामदेवता असलेल्या श्री देवी सातेरीचं जलमंदिर बिळवस येथे आहे. हे गाव जिल्ह्यातच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं आहे. कोकण प्रांतातलं एकमेव जलमंदिर या गावात पाहायला मिळतं. आषाढ महिन्यात या मंदिरात होणारी जत्रा म्हणजे दूरवर पसरलेल्या भाविकांसाठी देवीच्या दर्शनाच्या निमित्तानं एकत्र येण्यासाठी एक मोठी पर्वणीच असते.

सातेरी देवी
मालवण तालुक्यातलं बिळवस गाव ही मसुरे गावातली एक वाडी असली तरीही या वाडीस गावाचं महत्त्व प्राप्त झालं आहे, ते सुमारे ७०० वर्षापूर्वी उभारलेल्या श्री सातेरी देवीच्या जलमंदिरामुळेच! जैन घराण्यातल्या एका देवी भक्तानं हे मंदिर बांधलं आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून तिन्ही बाजूंनी ते पूर्णपणे पाण्यानं वेढलेलं आहे. मंदिरात एक मोठा मंडप व सभामंडप आहे. पूर्वी गाभा-यात मूर्ती नव्हती, तेव्हा एका उंच वारुळाची पूजा केली जात होती. त्या वारुळातच शेष रूपात देवीचं वास्तव्य असून अनेक भक्तांना देवीचं दर्शन शेष रू पानं झाल्याचं जुनेजाणते ग्रामस्थ सांगतात. मंदिराचा संपूर्ण परिसर निसर्गसौंदर्यानं नटलेला आहे. मंदिराच्या उजवीकडे एक विहीरवजा कुंड असून या कुंडातील पाणी कधीही आटत नाही. या तळीत भारताच्या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या नद्यांचं पाणी आणून सोडलेलं आहे, अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. कुंडाच्या तळाशी महादेवाची पिंड आहे.
मंदिराबाबत अनेक आख्यायिका आहेत. त्यानुसार मंदिर सभोवतालच्या तलावात गाई-म्हशींना पाणी पाजलं जात असे. एके दिवशी तलावातील वारुळातून रक्त येऊ लागलं. त्यावेळी एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवीनं दृष्टांत देऊन ‘माझं वास्तव्य या तलावातील वारुळात आहे. जनावरांपासून मला त्रास होत असल्यानं या वारुळावर माझ्यासाठी देवालय बांध!’ असं सांगितलं. देवीनं दिलेला हा दृष्टांत आदेश मानून ग्रामस्थांनी या ठिकाणी देवालय बांधलं. देवीच्या यात्रोत्सवाबरोबरच गावात धार्मिक पूजाअर्चा, विधींना देवदिवाळीपासून सुरुवात होते. यामध्ये गावपळण, देवीची पारध, होलीकोत्सव, दसरोत्सव, दहीकाला व गोंधळ हे उत्सव मोठय़ा भक्तिभावानं आणि जल्लोषात साजरे केले जातात.
मसुऱ्याच्या बारावाड्यांची श्री देवी सातेरी मूळ देवी मनाली जाते. मंदिर परिसरात नव्हे तर संपूर्ण गावात दारूबंदी असून येथे गावकरी दारूला स्पर्शही करीत नाहीत.
मसुरे गावातील अन्य मंदिरांमध्ये देव कार्य करण्यापूर्वी श्री देवी सातेरीचा अग्रहक्क मानून प्रथम तिची ओटी भरली जाते. संपूर्ण बिळवसमध्ये दत्तमंदिर, म्हातारीची राई, गांगोची राई, कुळकर देवस्थान, करावडे ब्राह्मण इ. देवस्थानं आहेत. गेल्या काही वर्षात मंदिर व मंदिर परिसराचं सुशोभीकरण पूर्ण करण्यात आलं आहे.

बिळवस येथील श्री सातेरी देवी जलमंदिर – https://www.youtube.com/watch?v=UoiPcRtZGOk
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!