MOUNTAIN OF GOD – UNEXPLORED HILL TOP

येथे अस्सल ग्रामीण संस्कृती पाहायला मिळते. भाकरी आणि चटणीच्या घासाबरोबर मिळणारे धारोष्ण दूध आणि साथीला भणभणता वारा.. सारेच कसे स्वर्गीय सुखाचा आनंद देणारे. येथील धनगर बांधव शुरवीर आणि काटकही. वाघालाही नमवणारे अन् मी मी म्हणणा-या प्राण्यांना आपलेसे करणारे. डोंगरावरचे शिवस्थान आध्यात्माचा ठेवाच म्हणायला हवा!

पाच मिनिटांत शंभर पावलांमध्ये दोन जिल्ह्यांच्या चार तालुक्यांमधून भ्रमंती सहज शक्य आहे. असे सांगितल्यावर विश्वास ठेवणार नाही. पण तुम्हाला यात कोणतीही अतिशयोक्ती याचे भान देवाच्या डोंगरावर पोहोचल्यावर लक्षात येईल. या स्थानाची तुलना दुस-या कशाशीही नको अगम्य, अविस्मरणीय आणि बरंच काही येथेच मिळविता येते, अनुभवता येते.. ढगांचे नृत्य, भणभणता वारा याचि देही याचि डोळा झेलावा मग मन पाखरू कसे होते.

भूतकाळ, वर्तमान सारं कधी विसरलो हे समजतही नाही. या स्थानावर सारं काही भरभरून घ्यावं. मस्तवाल वारा, नाक-कान गच्च करतो. धुक्याचे लोट अंगाखांद्यावर खेळू लागतात. जंगली प्राणी डोळय़ांसमोर मुक्तपणे हिंडत असतात. जैवविविधता तर येथे विपुल आहे. विशेष म्हणजे शहरी वस्तीत नेहमी गुणगुणत असणारी मच्छर कडीकुलपात राहणा-यांनाही अस्वस्थ करते. पण या भागात याचे नामोनिशान नाही.

येथे आकाशातील चांदणे न्याहाळात बसावे, पूर्ण आकाश अंगावर घेऊन झोपून जावे. तुम्हाला गंमत वाटेल पण दम्याचा कुणी रुग्ण असेल त्याने या चांदण्यात शेळया-मेंढय़ांच्या सहवासात झोप घ्यावी. दमा कुठच्या कुठे नाहीसा होतो. यामुळेच की, काय शेळया-मेंढयासोबत वावरणा-या या भागातील बांधवाच्या दिशेला ‘दमा’ फिरकतही नाही.  जगणं कसं असतं आणि असलेल्या सुविधांमधून आनंद कसा घ्यायचा हे येथे आल्यावर समजते.

डोंगरद-यात राहणारे धनगर बांधवांचे समृद्ध जग आणि सर्व सुविधा असूनही चिंतेच्या आठया डोक्यावर घेऊन वावरणारे आपले जग यात मग जमीन अस्मान दिसू लागते. हे स्थान आहे दापोलीच्या जामगे गावानजीकचे. येथे अस्सल कोकणाचे आदरातिथ्य धनगर बांधवांमध्ये न्याहाळता येते.

डोंगरावरचे शिवस्थान

सूर्योदय आणि सूर्यास्त याच डोंगरावरून पाहावा म्हणजे स्वर्गीय आनंदाची पर्वणीच अनुभवता येते. आध्यात्म आणि पर्यटन याची सांगड येथे जीवाभावाने सांधली गेली आहे. देवाच्या डोंगरावरच्या देव टेंबीवर शिवाचे मंदिर आहे.

दगडी बांधकामात साकारलेले मंदिर शिवकालात तानाजी मालुसरेंनी बांधले असावे असे काही उल्लेख सापडतात. सुमारे ५०० एकर क्षेत्रावर असलेली ही टेकडी रायगड, रत्नागिरी जिल्हयाच्या सीमेवर आहे. येथे मंडणगड, खेड, दापोली आणि रायगडमधील महाड तालुक्याची सीमा हद्द पोहोचते आणि या सर्व हद्दींचा केंद्रबिंदू शिवमंदिर आहे. डोंगर परिसरात धनगर बांधवांची मोठी वस्ती आहे. वस्ती जवळजवळ असली तरी दिशा जशा बदलतात तसे प्रत्येक वस्तीचे तालुके बदलून गेले आहेत.

अस्सल ग्रामीण संस्कृतीचे अनेक पैलू येथे पाहायला मिळतात. देवाच्या डोंगरावर पोहोचायचे तर दापोलीतून जामदे वाडीमार्गे रस्ता आहे. तुळशी गावातून पायवाट निघतात पण धनगर बांधवांशिवाय सामान्य माणूस त्या वाटेने जाऊ शकणार नाही. गेल्या काही वर्षाच्या पाठपुराव्यानंतर या वस्तीपर्यंत आता बारमाही रस्ता पोहोचला आहे. यामुळे देवाच्या डोंगरावर थेट गाडीने पोहोचता येते. रस्ता जेथे संपतो तेथून ५०० मीटपर्यंत ३९८ पाय-या आहेत. या पाय-या चढल्या की दगडी बांधकामात साकारलेल्या शिवमंदिराच्या प्रांगणात पोहोचतो. हे शिवलिंगाचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

 

दापोली तालुक्यात गगनाला भिडणारं, अतिशय सुंदर आणि भविष्यात पर्यटकांना खूप आकर्षित करेल असं एक ठिकाण आहे, ते म्हणजे ‘देवाचा डोंगर’. समुद्रसपाटीपासून ३५०० मीटर उंचावर असलेलं हे ठिकाण चार तालुक्यांचं केंद्रस्थान आणि दोन जिल्ह्यांच्या सीमा जोडणारं आहे. डोंगरावरच्या चार वाड्या दापोली, खेड, महाड, मंडणगड या चार तालुक्यांमध्ये विभागलेल्या आहेत. चारही वाड्यांमधून समस्त धनगर समाज राहतो. डोंगराच्या मध्यवर्ती शंकराचं स्वयंभू स्थान आहे, या स्थानामुळेचं डोंगराला ‘देवाचा डोंगर’ असे म्हटलं जातं. शिवमंदिर अगदी साधेसुधं आहे; पण मंदिराच्या परिसरातून चौफेर जे निसर्गाचे अप्रतिम, विहंगम दृश्य दिसतं, ते डोळ्यांना आणि मनाला अतिशय सुखद करणारं असतं. थंडीच्या दिवसात तर हे ठिकाण अनुभवण्याची निश्चितच एक वेगळी मजा आहे.  https://youtu.be/JsNJMNgTgZU

संदर्भ: प्रहार / देवाचा डोंगर

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *