शिळ्या भाताच्या रेसिपीज

सर्वसाधारण खाणारी तोंडे किती, याचा अंदाज घेऊनच तितका भात शिजवला जातो. मात्र, कधी अंदाज चुकतो किंवा कुणी भात जेवले नाही, की भात उरतो. अशा आदल्या दिवशीचा उरलेला भात कसा संपवावा हा मोठा प्रश्नच! कारण असा शिळा भात ऑफिसला जाणा-यांना डब्यात देता येत नाही, तसेच दुपारपर्यंत तो आणखी शिळा होऊन पांबण्याचीही शक्यता असते.  पण, या सर्व समस्यांवर चविष्ट उपाय ठरणा-या खालील रेसिपीज् पाहा तरी एकदा करुन!!

शिळ्या भाताचे थालीपीठ

साहित्य – १ वाटी शिळा भात, १ बारीक चिरलेला कांदा, १ बारीक चिरलेले टॉमेटो, तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ, चणा डाळीचे पीठ (तिनही समप्रमाणात एकणू २ वाट्या), लाल तिखट, मीठ, धणे-जिरे पावडर, कोथिंबीर, आंबट ताक, तेल

पाककृती

 • वरील सर्व साहित्य भातामध्ये एकत्र करुन घ्यावे. त्यामध्ये २ ते ३ चमचे आंबट ताक मिसळावे.
 • हे मिश्रण जाडसर होईल इतके पाणी त्यामध्ये मिसळावे.
 • त्यानंतर तव्यावर थोडे तेल गरम करुन, त्यावर थालीपीठ थापावे व वरुन झाकण देऊन थोड्यावेळाने थालीपीठ उलटावे.
 • थालीपीठ दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्यावेत व तसेच गरमागरम चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करावेत.

शिळ्या भाताचे कटलेट्स

साहित्य – १ कप शिळा भात, १ टि.धणे पावडर, १ टि. जिरे पावडर, १ टि.गरम मसाला, १/४ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, मीठ, हिंग, ७ ते ८ लसूण पाकळ्या, १ इंच आले, कोथिंबीर बारीक चिरुन, १/२ वाटी बेसन, २ टे.स्पू.कॉर्न फ्लॉवर, १ वाटी रवा, तेल

पाककृती

 • भातामध्ये धणे-जिरे पावडर, गरम मसाला, हळद, लाल तिखट, मीठ, हिंग, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर मिक्स करावी.
 • त्यामध्ये बेसन मिसळावा व मिश्रण नीट मळून घ्यावे. आता, त्यात कॉर्न फ्लॉवर मिसळून पुन्हा मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावे.
 • भाताचे लहान गोळे करुन घ्यावेत. त्यावर थोडा दाब देऊन, त्यास चपट आकार द्यावा.
 • कढईत तेल तापत ठेवावे. आता, कटलेट्स दोन्ही बाजूंनी रव्यात घोळवून, तापलेल्या तेलात सोडावेत.
 • साधारण तपकिरी रंगाचे होईस्तोवर खरपूस तळून घ्यावेत व गरमगरम सॉस सोबत सर्व्ह करावेत.

 दही भात 

साहित्य – २ वाटी शिळा भात, २ चमचे तेल, १/२ चमचा मोहरी व जिरे, ३ ते ४ कडीपत्त्याची पाने, २ हिरव्या मिरच्या, १/२ चमचा साखर, कोथिंबीर बारीक चिरुन, १ वाटी घट्ट दही, १/४ वाटी दूध, मीठ.

पाककृती

 • भात, दही, दूध व मीठ एकत्र करुन घ्यावे. फोडणीसाठी लहान कढईत तेल तापवून त्यामध्ये मोहरी व जिरे घालावे. नंतर त्यात कडीपत्ता, मिरच्या(चिरुन) घालाव्यात.
 • लगेचच फोडणी भाताच्या मिश्रणामध्ये घालून सगळं मिश्रण नीट एकत्र करुन घ्यावे. वरुन कोथिंबीर घालावी.
 • कैरी किंवा लिंबाच्या लोणच्यासोबत तयार दही भात सर्व्ह करावा.

उरलेल्या शिळ्या भाताचा दुस-या दिवशी फोडणीचा भात, हे ठरलेले समीकरण थोडे बाजूला सारुन, वरील रेसिपीज् नक्की करुन बघा! यामुळे, शिळा भात फुकट जाणार नाहीच, उलट या चविष्ट रेसिपीजमुळे आणखी चवीने फस्त होईल!

शिळ्या भाताचे वडे

घरच्याघरी शिळ्या भाताचे वडे करून खा. ही रेसिपी एकदम सोपी आहे. साधारण दोन वाट्या शिळा भात घ्या. चवीनुसार हिरव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या, कोथिंबीर आवडत असेल तर तीही घ्या. आल्याचा छोटा तुकडा, एक छोटा चमचा जिरेपूड, कढीपत्ता, थोडासा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ व चिमूटभर साखर हे जिन्नस घ्या.

वड्याच्या पिठाचं आवरण करण्यासाठी बेसन पीठ, तांदळाची पिठी, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जिरं घ्या. वड्याच्या आवरणासाठी बेसन भिजवून घ्या. भिजवताना दोन चमचे तांदळाची पिठी, चवीनुसार मीठ, कडकडीत तेलाचं मोहन व जिरं घाला. भात हातानं मोकळा करा व मळून एकजीव करा. त्यात आलं-मिरची-लसणीचा ठेचा, कोथिंबीर बारीक चिरून, मीठ व लिंबाचा रस, जिरंपूड घालून एकत्र करा. त्याचे वडे थापून बेसनात भिजवून गरम तेलात मध्यम आचेवर तळा. हे वडे अतिशय कुरकुरीत आणि खमंग होतात. ज्यांना बटाटेवडे खायचे नसतील त्यांच्यासाठीसुद्धा हा चांगला पर्याय आहे. ओल्या नारळाच्या चटणीबरोबर हे वडे खा.

Read more Recipes on the pages below:

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *