पेशवाई थाट

पेशवा हा पर्शियन शब्द असून त्याचा अर्थ ‘सर्वात पुढे असलेला’ असा आहे.

चांगल्या जेवणाचे वर्णन मराठीत ‘पेशवाई थाट’ असे सहजपणे केले जाते. कसा होता तो ‘पेशवाई थाट’?

‘पेशवाई थाट’ हा महाराष्ट्रात अगदी सहज वापरला जाणारा वाक्प्रयोग आहे. मध्यंतरी ‘पेशवाई थाट’ म्हणून पेशवाईतील जेवणावळींचे वर्णन करणारा एक कागद प्रसिद्ध आहे. त्या कागदात कामाची एक यादी आहे. सदर यादी ‘काव्येतिहास-संग्रहात प्रसिद्ध झालेली ऐतिहासिक पत्रे, यादी वगैरे लेख’ (संपादक गो.स. सरदेसाई, या. मा. काळे, वि. स. वाकसकर) अशी प्रसिद्ध झाली आहे. १० फेब्रुवारी १७८३ च्या नाना फडणवीस यांनी बनवून दिलेल्या नेमणूक यादीत सुमारे बावीस बंद आहेत. सवाई माधवराव पेशव्यांच्या लग्नातील जबाबदाऱ्या व नेमणुका नाना फडणवीस यांनी करून दिल्या आहेत.

यादीतील काही उल्लेख दिले, म्हणजे ‘पेशव्यांचा थाट’ आणि नाना फडणवीसांची काटेकोर व्यवस्था आणि शिस्त याचे काही मासलेवाईक नमुने नजरेस येतील. उदा०

  • जेवण झाल्यावर हात धुवायला कोमट पाणी, हातावर साखर व दात कोरावयास लवंग देत जावे.
  • गंध-अक्षत लावताना – वाकडे गंध लागू नयें व अक्षता लावताना नाकाला धक्का न लागता कपाळचा मध्य पाहून लहान मोठी अक्षत ओघळ न येता वाटोळी लावावी व गंध उभे-आडवे ज्यास पाहिजे तसे लावावे.
  • गंध अक्षत लावणार याणी नखे काढून बोटे चांगली करून लावावे’
  • गंध राहिल ते जपोन दूसरे दिवसास राखीत जावे.
  • विडे ज्यास जसे देणे तसे यथायोग्य पाहून देत जाणे. वावगा खर्च करू नये.
  • भोजनासाठी बनवायची पक्वान्ने व जिन्नस याची तर एक व्यवस्थित यादीच दिली आहे. अगदी विडा बनवण्यासाठीचे साहित्य व पूर्ण पद्धत यात दिलेली आहे.
  • चांगल्या कोशिंबिरी वीस प्रकारच्या व तिखट चटण्या चांगल्या बारीक वाटून रुचिकर कराव्यात. निंबू चिरून पंचामृत, रायती व भरते दोन आदिकरून पंचवीस तीस प्रकार करावे. एक दुसरी चमत्कारीक कोशिंबीर करावी, ‘विचारून वाढावी.’ !!

पेशवे घराण्यातील खाशांच्या स्वयंपाकासाठी जळण म्हणून लाकडाऐवजी फक्त कोळसे वापरले जात. पेशवे लाकडावर शिजवलेले अन्न ग्रहण करत नसत. पेशवाईत मक्ते नित्य व नैमित्तिक पंगतीचे भोजन बनवण्यासाठी दिले जात.

पेशवे मंडळींनी अनेक मेजवान्या पुण्याच्या हिराबागेत निरनिराळ्या कारणास्तव आयोजित केल्या. मेजवानीच्या बेतात साधा व केशरी गोड भात, कागदासारख्या पातळ पाटवड्या, पुरणपोळ्या, रंगीबेरंगी मिठाया, भाज्या, चटण्या, कोशिंबिरी, केळीच्या पानावर वाढल्या जात. पानाच्या बाजूला द्रोणात दूध, तूप, ताक, दही व द्राक्षाचे सार वाढलेले असे. पेशवे ब्राह्मण असल्याने त्यांचे सोवळेओवळे कडक असे. खुद्द पेशवे मेजवानीच्या पंगतीत भोजनात बसत नसत- दूर उभे राहून अथवा आसनस्थ होऊन पंगतीचा समाचार घेत.

नाना फडणीसांनी सवाई माधवराव पेशव्यांच्या प्रथम विवाहप्रसंगी भोजनसमयी पानात खाण्याचे पदार्थ कोठे व कसे वाढावे याबद्दलची वाढपाची पद्धत सुरू केली. पानात वरील बाजूला मध्यभागी मीठ, मिठाच्या डाव्या बाजूला चटण्या-कोशिंबिरी-लोणची-पापड-भजी-कुरडया व खीर-पुरण असे पदार्थ वाढले जात. मिठाच्या उजव्या बाजूला भाज्या-आमट्या-सार-सांबार व पक्वान्ने असत. पानाच्या मध्यभागी पोळ्या, पुऱ्या व भाताचे प्रकार हे मुख्य अन्नपदार्थ वाढले जात. वाढपाची ती पद्धत महाराष्ट्रात बर्या्च जुन्या घरांत टिकून आहे.

भोजन वाढपासाठी दीड-दोन हात लांब केळीचे पान, दर पानाच्या बाजूला दहा-बारा द्रोण असत. पानाभोवती रांगोळ्या, बसण्यास व टेकण्यास रुप्याच्या फुलांचे शिसवी पाट, चांदीच्या वाटीत गुलाबपाणी अथवा केशरपाणी (एक पक्वान्न खाल्ल्यावर त्याची चव दुसऱ्या पक्वान्नाला लागू नये म्हणून उजव्या हाताची बोटे स्वच्छ करण्यासाठी), पानात दहा भाज्या – त्यात तोंडली, परवरे (पडवळ), वांगी या भाज्या नित्य असत. तुरीचे वरण, दोन प्रकारचे सांबार, आमटी, दहा प्रकारची लोणची (त्यांतील एक साखरेचे गोड) असे. तीन-चार प्रकारच्या फेण्या, साधे वडे, वाटल्या डाळीचे कढीवडे, साजूक तूप, मध्यम गोड आंबट मठ्ठा, दोन प्रकारच्या खिरी (शेवयांची व गवल्यांची), सपिठाच्या पूर्ण पोळ्या (पुरण पोळ्या), खिचडी, ओले हरभरे, पापड, सांडगे,चिकवड्या, मिरगोंडे (मिरगुंडे), फळभाजीच्या तळलेल्या काचऱ्या, वीस प्रकारच्या कोशिंबिरी, फळभाज्या,पालेभाज्या, उडदाचे किंवा मुगाचे तळलेले किंवा भाजलेले पापड, तळवडे, पंचामृत, रायती, ताकाची कढी,चाकवताचे सांबार, मसालेदार वांगी, सुरण, पांढरा भोपळा, मेथी किंवा आंबाडीची भाजी, चटण्या, कोशिंबिरीत कोथिंबीर, लसण, आले, लाल मिरच्या, तीळ, जवस, कारले, आमसुले, हरभऱ्याची डाळ, लिंबे यांचा वापर करत. तसेच, आंब्याच्या लोणच्यांचाही समावेश असे. घीवर, आमरस, श्रीखंड (हे पक्वान्न दुसर्याआ बाजीरावांनी प्रचारात आणले). बासुंदी, केशरी साखरभात, जिलेबी (हे पक्वान्न मुघल बादशाह बाबर याने सर्वप्रथम भोजनात आणले), लाडू, पुरणपोळी (हे पक्वान्न जास्त रूढ होते) अशी गोड पक्वान्ने असत. भोजनोत्तर सात पानांचा प्रसिद्ध कुलपी  विडा दिला जाई (पेशवाईत स्त्रियांनाही विडा खाण्याची सवय होती).

पेशव्यांचा गणपती उत्सवातील ब्राह्मण भोजनाचा मक्ता सहा हजार नऊशे रुपयांचा असे. त्यात सव्वीस दिवस रोज पाचशे ब्राम्हण भोजन करत असत. त्यावरून दरपात्री भोजनाचा खर्च पेशव्यांना साडेआठ आणे येत असे. 1807 मधील गणपती उत्सवाच्या भोजनाचा मक्ता दररोज पाचशे ब्राह्मण याप्रमाणे दिला होता. तसेच नेवैद्य व थोरले पंगतीसाठी सव्वाशे भोजनपात्रे आणि नैमित्तिक प्रयोजनानिमित्त दरमहा एक हजार पात्रे मिळून भोजनाचा वेगळा मक्ता एकोणतीस हजार रुपयांचा दिला होता. त्या मक्त्यात वार्षिक सदुतीस हजार पात्रे होत. म्हणजे पात्री बारा आणे प्रमाणे भोजनखर्च होत असे.

  • श्रीखंड (हे पक्वान्न दुस-या बाजीरावांनी प्रचारात आणले)

  • जिलेबी (हे पक्वान्न मुघल बादशाह बाबर याने सर्वप्रथम भोजनात आणले)

Click the link below to be on our whatsapp group for updates on Offers / Freebies / Food Knowledge / Recipes and much more… https://chat.whatsapp.com/KYX5wuHoHyt2B4t5n4z4d9

संदर्भ इंटरनेट

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *