शहाळे (TENDER COCONUT)

ताजा, हिरवा नारळ हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात सर्वात पहिला येणारा विचार कोणता? वर्षांनुवर्ष तीव्र उन्हाळ्यात आपली तहान भागवणारं थंड आणि तजेला देणारं ताज्या, हिरव्या नारळाचं पाणीच आपल्याला आठवतं. पुन्हा विचार करा, ताज्या, हिरव्या नारळाचं केवळ पाणीच नाही तर इतरही गोष्टी लाभदायक असतात. कोवळ्या अवस्थेत असताना नारळ ताजा आणि हिरवा असतो. सामान्यत: या फळामध्ये ९० टक्के पाणीच असतं. ताज्या, हिरव्या नारळाचं पाणी पोषक असतंच, पण त्याहीपेक्षा पोषक असते ती मलईच! नारळाची मलईही परिपक्व होत जाते. पण पूर्णावस्थेला पोहोचलेल्या नारळातल्या मलईपेक्षा ताज्या, हिरव्या नारळातल्या मलईत जास्त गुणधर्म असतात. ताज्या, हिरव्या नारळाच्या मलईत भरपूर खनिजं असतात, पण फॅटस्, शर्करा आणि कोलेस्टेरॉल अत्यंत कमी असतं. ताज्या, हिरव्या नारळाच्या ११ औन्स मलईत केवळ ६५ कॅलरीज असतात. पण त्याहीपेक्षा त्यात पोषक घटकच अधिक असतात. एका ताज्या, हिरव्या नारळाची मलई खाल्ल्यास दर दिवसाला शरीराला आवश्यक असणारं मँगेनीज मिळतं. हे खनिज रक्त साकळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटकाच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. या मलईत १५ टक्के पोटॅशिअम असतं, जे आपले स्नायू, हाडं आणि पचनसंस्थेला कार्यरत ठेवतं. ताज्या, हिरव्या नारळाच्या मलईत आणखी एक महत्त्वाचं खनिज असतं, ते म्हणजे मॅग्नेशिअम. हे खनिज ऊर्जानिर्मितीसाठी तसेच मूत्रिपडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. नारळाच्या घट्ट खोबऱ्यापेक्षा मऊ असणारी मलई खायला अत्यंत सोपी असते. त्यामुळे ती पोषणाचा उत्तम स्रोत ठरते. रोगप्रतिकार यंत्रणा तसेच प्रदाहक घटकांना अवरोध करणाऱ्या घटकांना अधिक सक्षम बनवण्यात ही मलई कामी येते. मलईतून निघणाऱ्या तेलामध्येही भरपूर पोषक घटक असतात, जे केसांच्या पोषणासाठी उपयुक्त असतात. ताज्या, हिरव्या नारळाल्या मलईचे गुणधर्म आरोग्य आणि सौंदर्याच्याही पलीकडे जाणारे आहेत. हे तेल अत्यंत शुद्ध आणि हलकं असतं. त्यामुळे या तेलातून आजच्या जगतातल्या केसांच्या गरजांची पूर्तता करणारी उत्पादनं बनवता येतात. हा कोवळा नारळ अत्यंत श्रमहारक आहे. शहाळ्यातील पाणी हे स्वादिष्ट, क्षारयुक्त व पचण्यास हलके असते. त्यामुळे आजारी व्यक्तीला पोटावर ताण न येता, त्वरित तरतरी देण्याचा हा एक सोपा उपाय आहे. शहाळ्याचे पाणी जुलाब, उलटी, उच्चरक्तदाब, ऍसिडिटी, अल्सर, पायात गोळे येणे, लघवीला कमी होणे, मुतखडा अशा सर्व तक्रारींवर उपयोगी ठरते. उन्हात कष्टाची कामे करणारे, नर्तक, क्रीडापटू या सर्वांना इन्स्टंट एनर्जी देणारे हे फळ आहे. १०० मिली.शहाळ्यातील पाण्यात  निव्वळ २४ उष्मांक असतात व ०.१ ग्रॅम फॅट्‌स असतात. शहाळ्यातील मलईमध्येही १०० ग्रॅम मागे फक्त ४१ उष्मांक आणि १.४ ग्रॅम फॅट्‌स असतात. चहा, कॉफी, सिगारेट, दारू यांच्या व्यसनांनी बिघडलेला रक्ताचा पी.एच. नारळाच्या पाण्याने पूर्ववत आणता येतो. केसांच्या देखभालीसाठीची उत्पादनं विविध प्रकारच्या वनस्पतीजन्य तेलांपासून बनवली जातात. त्यांच्यातल्या फॅटी अॅचसिड घटकांमुळे ती एकमेकांपेक्षा वेगळी असतात. काही तेलं सॅच्युरेटड फॅटी अॅकसिड्सनी समृद्ध असतात, पण त्यांच्या अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडस् कमी असतात. ताज्या, हिरव्या नारळाच्या तेलामध्ये अत्यंत अभिनव आणि संतुलित ट्रायग्लिसराइड रचना असते, जी केसांना पूर्ण पोषण पुरवते. हे तेल हलकं असल्याने ते सहजपणे पसरतं आणि केसांमध्ये लवकर शोषलं जातं. त्यामुळे केसांना आवश्यक ते पोषण मिळतं. त्याचा सौम्य आणि ताजा सुगंध तेल लावण्याचा अनुभव अधिक आनंददायी बनवतो. एकंदरीतच, ताज्या, हिरव्या नारळाच्या मलईचं तेल असं एक आधुनिक तेल आहे जे निसर्गत:च हलकं आहे आणि पोषकही आहे.

शहाळ्याचे काही पदार्थ

लाल भोपळा-शहाळ्याचे तोंडक.

साहित्य. १ वाटी लाल भोपळ्याचे तुकडे, १ वाटी शहाळ्याचे तुकडे, ओले काजू २ वाटी, भिजवलेली चानाडाळ /४ वाटी मटार उभा चिरलेला कांदा बारिक चिरलेला कांदा-२ दालचिनी, २-३ लवंग-२ काळी मिरी टेबलस्पून अख्खे धने टेबलस्पून ओले खोबरे, ३ टेबलस्पून नारळाचे दूध टेबलस्पून हळद टेबलस्पून लाल तिखट टेबलस्पून मोहरी, हिंग, चिमुटभर,मीठ चवीनुसार.

कृती. सर्वप्रथम पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात दालचिनी, लवंग, काळी मिरी, उभे चिरलेले कांदे, धने टाका. कांदा लाल होईपर्यंत भाजा. त्यात ओले खोबरे टाका. एका प्लेटमध्ये हे काढून घ्या. त्यात हळद घालून मिक्सरमध्ये हे मिश्रण वाटून घ्या. भाजी बनविण्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात मोहरी, हिंग, काळी मिरी, कोथिंबीर, कांदा टाका. यात आता हळद, लाल मिरची पावडर, चनाडाळ, पाणी घाला. यात लाल भोपळ्याचे तुकडे आणि वाफवलेले मटार घाला. थोडे पाणी घालून ५ मिनिटे शिजू द्या. ५ मिनिटानंतर त्यात शहाळ्याचे तुकडे, ओलो काजू, कांदा-खोबऱ्याचे वाटण घाला. थोड्या वेळानंतर यात नारळाचे दूध आणि मीठ घाला. उकळी आली की गॅस बंद करा. गरमागरम शहाळे-भोपळ्याचे तोंडक तयार.

शहाळ्याचे सरबत

शहाळ्याचे सरबत

साहित्य. एका शहाळ्याचे पाणी, २ बाटल्या सिट्रा, साखर, मीठ, लिंबाचा रस, बर्फाचा चुरा

कृती. शहाळ्याचे पाणी, २-३ चमचे लिंबाचा रस, चवीप्रमाणे साखर, मीठ व बर्फ घालून हे सर्व मिक्सरमधून फिरवून घ्यावे. प्यायला देताना या मिश्रणात सिट्रा घालून द्यावे.

शहाळे आणि काजुची भाजी.

साहित्य. ३ कप शहाळयातील कोवळे खोबरे, अर्धा कप ओले काजू किंवा पाण्यात भिजवलेले काजू, ४ टेबलस्पून तेल, ३ कप पातीचा कांदा बारीक चिरलेला, १ मोठा टोमॅटो बारीक चिरलेला, १ टीस्पून आले-लसूण पेस्ट, १/२ टीस्पून हळद, १ टीस्पून लाल तिखट १ टीस्पून गरम मसाला पावडर, २ टेबलस्पून टोमॅटो केचप, २ टेबलस्पून कोथिंबीर चवीनुसार मीठ.

कृती. शहाळयातील खोब-याच्या दोन इंच लांबीच्या पट्टया (तुकडे) कापून बाजूला ठेवाव्या. काजू पाण्यात भिजत घालावे. एक कढईत तेल गरम करून पातीचा कांदा रंग बदलेपर्यंत परतून घ्यावा.नंतर त्यात टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवावा.खोब-याच्या पट्टया (तुकडे) व काजू घालून दोन मिनिटे परतावे. आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट व गरम मसाला आणि अर्धा कप पाणी घालून पाणी आटेपर्यंत शिजवावे. नंतर मीठ व टोमॅटो केचप घालून नीट ढवळावे. कोथिंबीर घालून भाजी सजवावी व गरम गरम खायला द्यावी.

शहाळ्याचे आइस्क्रीम.

शहाळ्याचे आइस्क्रीम.

साहित्य.अर्धा लिटर दूध, पाव वाटी साखर, एक वाटी शहाळ्याची मलई, सजावटीसाठी स्ट्रॉबेरी.

कृती. प्रथम दूध उकळत ठेवावे. त्यात साखर घालून उकळून थंड करून ठेवावे. शहाळ्याची मलई गार झालेल्या दुधात घालावी. मिक्स रमधून फिरवावे. नंतर फ्रिजमध्ये सेट करण्यास ठेवावे. सर्व्ह करताना स्ट्रॉबेरीने सजवावे.

फणसाच्या आठळ्या, काजू, शहाळ्याची भाजी.

साहित्य. २ वाट्या फणसाच्या आठळ्या, अर्धा कप ओले काजू किंवा पाण्यात भिजवलेले काजू, अर्धा कप कोवळे खोबरे पातळ काप करून, १ बारीक चिरलेला कांदा, २ छोटे स्पून गोड घट्ट दही, १ चमचा साय, चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, ७-८ कढीपत्ता, २ चमचे तूप, जिरे, हळद

वाटण. २ ते ३ टेबलस्पून मलईचं खोबरं, १ छोटा कांदा उकडून, २-३ लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, १ चमचा लाल तिखट, पाव कप टोमॅटो हे सगळं मिक्सरमधून वाटून घ्या.

कृती. आठळ्या मीठ घालून उकडून घ्या. त्याची सालं काढून टाकून पातळ काप करा. कोवळ्या नारळाचंही काप करून ठेवा. २ तास काजू पाण्यात भिजवून ठेवा. कढईत २ चमचे साजूक तूप घाला. त्यात जिरं, कढीपत्ता घाला. कांदा परतून घ्या. हळद घाला. आता वाटलेलं वाटण घालून तूप सुटेपर्यंत परतून घ्या. त्यात शहाळे काप, आठळ्याचे काप व काजू घाला. थोडं परता. त्यात दही व साय घाला. थोडे परतून त्यात १ वाटी गरम पाणी घाला. मीठ, साखर घाला. २-३ उकळ्या आल्यावर गॅस बंद करा. वरून कोथिंबीर, खोबरं, काजू घालून सजवा.

शहाळ्याचे फायदे जाणून घ्या …

Health Benefits

  • अडसर- कोवळा फक्त पाणी पिण्यायोग्य. किंचित साईसारखी मलई असलेला नारळ असेल तर त्यास शहाळे, काकडे, काबा या नावांनी ओळखले जाते.
  • उचकी लागली असता शहाळ्याचे पाण्यात बर्फ टाकून घ्यावे.
  • उष्णतेमुळे अंगाचा दाह होत असल्यास शहाळ्याच्या पाण्यात खडीसाखर घालून घ्यावे.
  • अर्धशिशीच्या विकारात रात्री शहाळ्याच्या पाण्यात खडीसाखर घालून पाणी झाकून ठेवावे.
  • रक्तप्रमेहात शहाळ्यातील अर्धे पाणी काढून टाकून राहिलेल्या पाण्यात दोन चिमटी तुरटीची पावडर टाकून तोंड बंद करून रात्रभर तसेच ठेवावे. सकाळी मुखमार्जन करून हे पाणी नीट ढवळून घ्यावे. 3-4 दिवस हा उपचार करताच गुण नजरेस येतो.
  • डोके भ्रमिष्टासारखे होत असल्यास रोज नेमाने सकाळी एक शहाळे घ्यावे.
  • लहान मुलांना सर्दीचा त्रास जाणवत असल्यास शहाळ्यातील मलईदार खोबरे चांगले घोटून खावयास द्यावे.
  • मोठी जखम भरून येण्यासाठी शहाळ्यातील घोटलेल्या मलईदार खोबऱ्याचा लेप करावा.
  • अकाली पडणाऱ्या सुरकुत्या टाळून चेहरा सतेज दिसण्यासाठी शहाळ्यातील मलई चांगली घोटून लोण्यासारखी झाल्यावर चेहऱ्यास लावावी. अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने चेहरा हळूवारपणे धुऊन सुती कापडाने चांगला टिपून घ्यावा.
  • लघवीच्या विकारात शहाळ्याचे पाण्यात संत्रे/लिंबाचा रस टाकून वरचेवर घेत राहावे.

 

संजीव वेलणकर

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *