कैरीचे पदार्थ

सध्या लॉक डाऊन मुळे आपण घरीच आहोत, कैरी खरेदी साठी मेन बाजारात न जाता शेजारील भाजी वाल्याकडून थोडी थोडी कैरी आपण आणत आहोत, पण आता थोडेच दिवस राहिले आहेत पूर्वीचे दिवस येण्यास.

सध्या बाजारात भरपूर प्रमाणात कैरी आली आहे. कैरी अनेकांना आवडते. जेवणासोबत कैरी खाण्याची तर एक वेगळीच मजा असते. पिंपल्स, उष्मघात, अपचनाची समस्यां यासाठी कैरी एक उपयोगी फळ आहे. शरीरात विटामीन’सी’ किंवा विटामीन’ए’ चे प्रमाण कमी झाल्यास ते पुन्हा मिळवण्यासाठी कैरी फायदेशीर आहे. साठवणीचे, वाळवणाचे पदार्थ करण्यासाठी योग्य वेळ असलेल्या या काळात कैरीचे वर्षभर टिकणारे लोणचे हमखास होतेच.

लोणच्यासाठी कैरी विकत घेताना ती पूर्ण जुन, टणक, पांढरी स्वच्छ व चिरताना करकर वाजत असेल अशीच घ्यावी, तसेच फोडीला एक कारचा चवदार आंबटपण असावा. डागळलेल्या कैऱ्या घेऊ नयेत…

काही कैरीचे पदार्थ:

कैरी सॉस

साहित्य. १ लहान कैरी, १ वाटी साखर, ८-१० काश्मिेरी लाल मिरच्या, २ टेबल स्पून लसूण पाकळ्या मीठ चवीनुसार.

कृती. कैरीचं साल काढून घ्या. एक चमचा कैरी बारीक चिरा. बाकीची चिरून मिक्सलरवर बारीक करा.

काश्मिारी मिरची अर्धा तास पाण्यात भिजवा. मिक्सैरवर बारीक करा. लसूण पाकळ्या चिरून ठेचून घ्या. सगळं साहित्य एकत्र करून अर्धा तास झाकून ठेवा. अर्ध्या तासाने जाड बुडाच्या पातेल्यात हे मिश्रण घालून मंद गॅसवर शिजायला ठेवा. मधे मधे ढवळत रहा. मिश्रण घट्ट वाटलं तर पाव वाटी व्हाइट व्हिनेगर किंवा पाणी घाला. पारदर्शक झालं की गॅस बंद करा.

झटपट कैरीचे लोणचे

साहित्य. एक कैरी, १ वाटी गूळ, गोडे तेल अर्धी वाटी, मेथ्या १/२ चमचा, ४ चमचे तिखट, हळद १ चमचा, मीठ चवीनुसार

कृती. कैरी साल काढून किसून घ्या. त्यात मीठ व गूळ कालवून घ्या. १ चमचा तेलात १/२ चमचे मेथ्या तळून घ्या. त्या कुटून किसलेल्या कैरीत टाका. ३ चमचे गोडेतेल गरम करून त्यात हळद, तिखट तळून त्याची फोडणी किसलेल्या कैरीत घाला. हे लोणचे साधा वरणभात किंवा खिचडी सोबत स्वादिष्ट लागते.

कैरीची कढी

साहित्य. एक नारळ, एक मध्यम कैरी उकडलेली, गूळ, मीठ, फोडणीसाठी अर्धा टि स्पून तेल, अर्धा चमचा मेथीचे दाणे, ४ सुक्या मिरच्या,

कृती. कैरी उकडून तिचा गर काढून घ्यावा. नारळाचं दूध काढून घ्यावे. नारळाच्या दूधात गूळ विरघळवून घ्यावा. कैरीचा गर थोडा थोडा करून नारळाच्या दूधात मिसळावा. कैरीच्या आंबटपणावर किती गर लागेल ते अवलंबून असतं. सगळा गर लागेलच असंही नाही. चवीप्रमाणे मीठ घालून कढी उकळण्यास ठेवावी. फक्त अर्धा चमचा तेल घेऊन फोडणीसाठी तापत ठेवावं. तेल तापलं की त्यात मेथीचे दाणे घालावेत आणि सुक्या मिरच्यांचे तुकडे घालून चमच्याने फोडणी जरा परतवून मगच कढीत घालावी.

कैरीची चटणी

साहित्य. १ कैरी, ३ हिरव्या मिरच्या, भाजलेले शेंगदाणे थोडे, ४ काड्या कोथिंबीर, १ कांदा, आवडीनुसार साखर किंवा गुळ, चवीनुसार मीठ, तेल, हिंग, हळद (फोडणीसाठी)

कृती. कैरी चिरून त्यामध्ये हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे, कांदा, आवडीनुसार साखर किंवा गुळ यांचं मिश्रण करून मिक्सररमधून बारीक करणे. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणे. नंतर तेल गरम करून हिंग आणि हळदीची फोडणी घाला. वरून कोथिंबीर बारीक चिरून टाका.

कैरीचे सरबत

साहित्य. एका कच्च्या कैरीचा गर (कैरी सोलून फक्त पांढरा गर), २ मोठे चमचे साखर, अर्धा छोटा चमचा केशर-वेलची अर्क, चिमुटभर मीठ

कृती. वर नमूद केलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घ्यावे. -२ ते ३ मिनटे मिक्सरवर चांगल एकजीव होईपर्यंत वाटावे. ह्यात दिड भांड थंड पाणी घालून सरबत तयार करावे

कैरीची लुंजी

साहित्य. २ कैरीच्या फोडी, २ चमचे तेल, जीर, मोहरी फोडणीसाठी, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, पाव चमचा तिखट, २ मध्यम आकाराचे गुळाचे खडे, पाणी .

कृती. छोटी कढई गॅसवर ठेवावी. तेल घालुन मोहरी , जीर्याीची फोडणी करावी. तडतडल्यावर त्यात कैरीच्या फोडी टाकाव्या . व्यवस्थित हलवून घेतल्यावर त्यात तिखट, मीठ, हळद आणि गुळाचे खडे टाकावे. त्यानंतर त्यात अर्धी वाटी पाणी टाकून झाकण ठेवून ५ ते ७ मिनिटे शिजू द्यावे.

मेथांबा

साहित्य. दोन मध्यम कैरी साल काढलेली,दिड वाटी गुळ,दहा ते पंधरा मेथी दाणे,एक चमचा जिरे,पाव चमचा हिंग,पाव चमचा हळद, दोन चमचे तेल,पाव वाटी पाणी

कृती. एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या त्यात जीरे,मेथी दाणे फोडणी करून घ्यावी व तडतडल्यावर हिंग हळद व कैरीच्या फोडी घालून परतावे व पाव वाटी पाणी घालून एक उकळी आली कि दीड वाटी गूळ घालून शिजवून घ्या,गुळाचा पाक होऊन पाणी घातल्याने कैरीची फोड नरम राहील,वातड होणार नाही,पाकावर आले कि म्हणजे घट्टसर होत आलं कि गॅस बंद करावा.

खार कैरी

साहित्यः २५ कैऱ्या, १ किलो मीठ, कैऱ्या बुडतील इतके पाणी.

कृतीः कैऱ्या धुऊन, पुसून, डेख काढून त्यांत मीठ घालावे व ह्या कैऱ्या बुडतील इतके पाणी घालावे. चिनी मातीच्या बरणीत घट्ट झाकण लावून थंड ठिकाणी ठेवावे. वर्षभर ही कैरी ताजीच राहते. आपणास हवी तेव्हा कैरी काढून उपयोगात आणू शकतो.

कटकी कैरी लोणचे

साहित्य. १ किलो कैऱ्या, दीड किलो साखर, ४ चमचे तिखट, ४ चमचे मीठ, १ चमचा जिरेपूड.

कृतीः कैरीची साल काढून लहान लहान फोडी कराव्यात. ह्या फोडींना मीठ चोळून दुसऱ्या दिवशी त्यांचे पाणी काढून टाकावे. जितक्या फोडी होतील तितकीच साखर त्यात मिसळावी. स्टीलच्या पातेल्यात हे मिश्रण घालून पातेल्याचे तोंड कापडाने बांधून उन्हात ठेवावे. रात्री घरात आणल्यावर हे मिश्रण चमच्याने ढवळावे. आवडीनुसार दाट झाल्यावर छुंद्या प्रमाणे तिखट, मीठ, जिरेपूड घालून पुन्हा एक दिवस उन्हात ठेवून मग हे मिश्रण बरणीत भरुन ठेवावे. हे लोणचे वर्षभर टिकते.

आंबोशी (सुकलेल्या कैरीच्या फोडी)

कृती. पाण्यात दोन चमचे मीठ घालून, त्यात साले काढलेल्या कैरीच्या फोडी घालाव्यात व एक तास थांबून फोडी स्वच्छ पाण्याने धुवाव्यात. या फोडींना दोन चमचे मीठ चोळून त्या कडक उन्हात वाळण्यास ठेवाव्या. या वाळलेल्या फोडी म्हणजेच आंबोशी. आंबोशी कुटून पूड केल्यास त्याचा उपयोग कैरीची डाळ, छोले, भेळ अशा पदार्थांवर घालण्यास होतो.

आंबोशीचे लोणचे

साहित्य: ३/४ कप आंबोशी (सुकलेल्या कैरीच्या फोडी), दोन कप गूळ, १/४ कप लाल मोहरीची पावडर, १ टिस्पून तळलेली मेथीची पावडर (मेथी दाणे तळून कुटून घ्यावे)

१/४ कप मिठ किंवा चवीनुसार, १/२ टिस्पून मोहरी, १ टिस्पून हळद, १ टिस्पून हिंग, १/४ कप तेल.

कृती. २ वाट्या पाणी उकळवून गॅस बंद करावा. सुकलेल्या फोडी रात्री या गरम पाण्यात घालाव्यात. आणि झाकून ठेवावे. सकाळी पाणी काढून टाकावे. एका भांड्यात मोहोरी पावडर आणि १/४ कप पाणी घालून पांढरट होईस्तोवर फेसावे. किंवा मिक्सरमध्ये घालून फेसावे. फक्त पाणी हळूहळू घालावे.  तेलात मोहोरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. फोडणी गार होवू द्यावी.  गूळामध्ये थोडे पाणी घालून गॅसवर ठेवावे. गूळ पातळ झाला कि गॅस बंद करावा.  फेसलेली मोहोरी पावडर, मेथी पावडर, कोमट झालेला गूळाचा पाक आणि गार झालेली फोडणी फोडीमध्ये घालून मिक्स करावे. तयार लोणचे लगेच खाता येईल. पण ८ दिवसांनी मुरल्यावर अजून छान लागते.

 

संदर्भ. इंटरनेट

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *