CHANDIKA DEVI TEMPLE, DABHOL

सर्व मंगल मांगल्ये शिवेसर्वाथ साधिके! शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते!!

श्री स्वयंभू चंडिका देवीचे रुप जेव्हढे सुंदर तेव्हढेच रौद्रही भासते. देवीच्या भुवया मोठ्या असून ती आपल्या नयनांनी संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून असल्याचे सांगतात. देवीला चार हात असून तीच्या उजव्या हातात तलवार आहे. श्री चंडीकेचे मुख नैऋत्य दिशेला असून ती पूर्णपणे शाकाहारी आहे. दाभोळ गावात असलेल्या ईंगळाइ-भैरीदेवी या श्री चंडीकेच्या बहिणी असून दालभ्येश्वर, नवनाथ दत्त मंदिर आदी देवांना तीने आपल्या छत्रछायेखाली घेतले आहे असे स्थानिकांचे मत आहे. अशा या जागृत देवीचे दर्शन घेऊन त्या अंधाऱ्या गुहेतून पणत्यांच्या मंद प्रकाशात प्रदक्षिणा पूर्ण करून आपण बाहेर पडतो. बाहेरील रचनेवरून आत असलेल्या गुहेची अजिबातच कल्पना येत नाहि. फार पूर्वी दालभ्य ऋषींनी या गुहेत तपसाधना केल्याचे सांगितले जाते.

 

चंडिकादेवी मंदिर दापोली-दाभोळ रस्त्यावर दाभोळच्या अलीकडे पठारावर तीन किमी. अंतरावर डाव्या हाताला मुख्य रस्ता सोडून वसलेले चंडिकादेवी मंदिर हे स्वयंभू समजले जाणारे स्थान आहे. एकसंध दगडात तयार झालेल्या नैसर्गिक गुहेमध्ये देवीची सुमारे साडेतीन फूट उंचीची काळया पाषाणतील शेंदूर लावलेली मूर्ती आहे. देवीला चार हात असून हातात तलवार, ढाल व इतर आयुधे आहेत. देवीच्या मूर्तीजवळच एक इतिहासकालीन तलवार असून ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे, अशी येथील पुजार्‍यांची श्रद्धा आहे. चांदीच्या पत्र्याने मढवलेले गुहेचे तोंड लहान असून, आत वाकून जावे लागते. गुहेत उतरत्या वाटेवर पायऱ्या त्याच खडकात कोरलेल्या आहेत. त्यांवरून सुमारे पाच-सहा फूट अंतर आत चालत जावे लागते. ही वाट पूर्ण अंधारी आहे. या वाटेवर इतका काळोख आहे की पुढे कोणत्या दिशेला कसे जावे हे चटकन समजत नाही. परंतु डोके थोडे खाली वाकवून तसेच अंधारात अंदाजाने पुढे गेल्यावर देवीपुढच्या समईचा मंद प्रकाश दिसतो आणि हायसे वाटते. या ठिकाणी उजवीकडे वळल्यानंतर आपण देवीसमोर येतो. या देवीला फक्त तेलाच्या दिव्याच्या प्रकाश चालतो. इतर कोणत्याही प्रकारचा प्रराकाश किंवा कॅमेर्‍याचा फ्लॅश लाईट लावलेला चालत नाही, असे येथील पुजारी सांगतात. देवीच्या उजवीकडे अंधार्‍या जागी असलेले एक भुयार थेट काशीला (?) जाते असेही पूजारी मंडळी सांगतात. देवीचे मन प्रसन्न करणारे गूढगंभीर पण आश्वासक रूप पाहून पुढे वाकूनच जावे लागते. यावेळी आपला उजवा हात खडकाला स्पर्श करून पुढे जात देवीला प्रदिक्षणा पूर्ण झाली की आपण पुन्हा मूळ जागी येतो व तेथून डावीकडे वळून आल्या मार्गाने परत बाहेर पडता येते. चंडिकादेवी मंदिर हे मंदिर अतिशय पुरातन असून याला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिली होती असा उल्लेख इतिहासात असल्याचे समजते. दाभोळ जिंकल्यावर राजांनी पुढे अंजनवेलचा गोपाळगड, गोवळकोट व आडीवरे भागावर स्वारी केली. या मोहिमेरम्यान त्यांनी अनेक वेळा या स्थानास भेट दिली होती. पुढील काळात मात्र हे स्थान लोकविस्मृतीत गेले. कालांतराने जमनापुरी नावाच्या दाभोळमधील साधकास देवीने स्वप्राप्त दृष्टांत दिला. त्यानुसार त्यांनी या गुहेचा शोध घेतला व अनेक वर्षे ते देवीची निस्सीम भक्ती व पूजाअर्चा करत राहिले. अखेरीस चंडिकामातेच्या समोरच ते समाधिस्थ झाले. गुहेतून बाहेर पडल्यावर समोरच्या दगडी चौथर्‍यावर त्यांची व त्यांच्याच कुळातील आणखी एका साधकाची समाधी आहे. पुरी घराण्याकडेच आजही देवीची पूजा, अभिषेक करण्याचे हक्क आहेत. या चौथर्‍यावर तुळशी वृंदावन व छोटी-छोटी शिवलिंगे दिसतात. येथून खाली पायऱ्या उतरून गेल्यावर बारमाही झुळूझुळू वाहणारा थंड पाण्याचा झरा आहे. मंदिरपरिसराच्या बाहेर दिसणारे तटबंदीचे पडके अवशेष दाभोळच्या किल्ल्याचे आहेत. या किल्याबद्दलची फारशी माहिती उपलब्ध नाही. इतर मंदिरापेक्षा वेगळे असे हे गूढरम्य स्थान आवर्जून पाहावे असे आहे.

Like and Follow Harsha Holidays: https://www.facebook.com/harshaholidays/

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *