MAHALAXMI TEMPLE – KELSHI
गावाच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या उटुंबर डोंगराच्या पायथ्याशी महालक्ष्मी मंदिर आहे. मंदिर उत्तराभिमूख असून बांधकाम पेशवाई काळातील आहे. लांबून बघितले तर या मंदिराच्या इमारतीची रचना माशिदिप्रमाणे दिसते.

श्री महालक्षमी मंदिर – केळशी
इतिहासकाळात आपली मंदिरे भ्रष्ट होण्या पासून वाचवण्यासाठी तसेच गावाचे मांगल्य राखण्यासाठी केलेला हा एक उपाय असावा. मागील बाजूस असणाऱ्या उटुंबर डोंगराच्या घनदाट झाडीच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर सुरेख दिसते. या मंदिरला दोन घुमत असून त्याचे संपूर्ण बांधकाम चुना दगड असा पुरातन पद्धतीने केलेले आहे. दोन घुमटांपैकी एका घुमटाखाली श्री महालक्ष्मी देवीचे स्वयंभू स्थान आहे, दुसर्या घुमटाखाली सभागृह आहे. सभागृहात प्रवेश करण्यासाठी तीन बाजूने दरवाजे आहेत. या घुमटांची उंची खूप असल्यामुळे बाहेर कितीही उन तापलेले असले तरी यांच्या आतली हवा एकदम थंडगार असते. असे असूनही सूर्योदयानंतर काही विशिष्ट वेळेस सूर्य किरणे देवीवर पडतील तसेच सुर्यास्थाच्या वेळेस हीच सूर्यकिरणे देवीचे चरणस्पर्श करतील अशी विलक्षण रचना या मंदिरात केलेली आहे.
मंदिरापुढे धर्मशाळा बांधलेली असून त्यात पार्वती, गणपती आणि शंकराची पिंडी आहे. हि श्री शंकराची पिंडी तीलातीळाने वाढते अशी आख्यायिका आहे. मंदिराच्या प्रांगणात वड,
पिंपळाची मोठ्या प्रमाणावर फोफावलली झाडे आहेत. या संपूर्ण मंदिराला पुरुषभर उंच जाभ्या दगडाची तटबंधी आहे. मंदिर परिसरात मागच्या बाजूला एक गोड्या पाण्याची विहीर असून तटबंधीच्या बाहेरच्या बाजूस एक खोल तळे आहे. या गोड्या पाण्याच्या विहिरीचे महत्व कारण संपूर्ण केळशी गावात खारे (मचूळ) पाणी असलेल्या विहिरी आहेत, पण देवीच्या मागच्या ह्या विहिरीचे पाणी मात्र गोड आहे. देवळामागे असलेल्या तळाच्या पायऱ्या बांधीव आहेत. त्यात अनेक कमळे उमललेली असतात. ह्या तळ्यात जिवंत झरे असल्यामुळे बारा महिने पाणी असते.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी थोड्या उंचावर प्रसंगसमयी सनई चौघडा वाजविण्यासाठी नगारखाना बांधला असून, नित्यनियमाने सकाळ संध्याकाळ देवळामध्ये सनईचे मंगल सूर गुंजतात. या मंदिरात चैत्र शुद्ध अष्टमी ते चैत्र शुद्ध पौर्णिमा दरम्यान मोठा उत्सव असतो. हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. याखेरीज ह्या देवळात नवरात्रोत्सवसुद्धा साजरा केला जातो. या उत्सवाच्या वेळी गोंधळ, कीर्तन, रथयात्रा असे कार्यक्रम असतात व संपूर्ण गाव जातीभेद विसरून या उत्सवात सहभागी होते.
या देवीचे विशेष आख्यायिका अशी की कोणत्याही भावाकाने कोल्हापूरच्या आंबाबाईला बोललेला नवस त्याला तिथे जाऊन फेडणे शक्य होत नसेल तर तो नवस या महालक्ष्मी मंदिरात फेडला तरी चालतो, पण जर ह्या स्थानी कोणी भाविकाने नवस बोलला असेल, तर त्या भाविकाला तो नवस फेडायला इथे केळशीतच यावे लागते, बाकी कोणत्याही ठिकाणी त्याचा नवस फेडला जात नाही, असे येथील देवीचे महात्म्य आहे.
Like and Follow Harsha Holidays: https://www.facebook.com/harshaholidays/

मंदिर परिसरातील तळे – https://www.youtube.com/watch?v=o8jFFQLllzI
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!