JAIGAD FORT
रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री नदीच्या खाडीत उभारण्यात आलेला जलदुर्ग प्रकारातील जयगड किल्ला विजापूरकरांनी बांधला. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर जयगड गावातील उंच टेकडीवर हा किल्ला उभारण्यात आला आहे. सागरी क्षेत्रावर लक्ष देण्याच्यादृष्टीने हे स्थान महत्वाचे असावे.
किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगणारे १६ व्या शतकातील संदर्भ उपलब्ध आहेत. विजापूरकरांनी बांधला असला तरी फार काळ त्यांना किल्ला ताब्यात ठेवता आला नाही. १५७८-८०च्या दरम्यान संगमेश्वराच्या नाईकांनी किल्ल्याचा ताबा घेतला. आदिलशाहने अनेकदा किल्ला मिळविण्याचे प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही. पुढे १६९५ च्या दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता. १८१८ च्या इंग्रज-मराठा युद्धाच्यावेळी हा किल्ला सहजपणे इंग्रजांना मिळाला.
गावाच्या उत्तरेस असलेला हा किल्ला उत्तर, पूर्व आणि पश्चिम या तिन्ही बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे. किल्ल्यात दक्षिणेकडील दिंडी आणि पश्चिमेकडील चोर दरवाज्यातून प्रवेश करता येतो. किल्ला १२ एकर परिसरात पसरलेला असून अजूनही मजबूत अवस्थेत आहे. बालेकिल्ला आणि परकोट या दोन भागात किल्ल्याची रचना केली आहे. बालेकिल्ल्यास महाद्वार आहे. किल्ल्याला जांभा पाषाणापासून बनविलेली मजबूत तटबंदी आहे. तटबंदीच्या बाजूला खंदक कोरलेले आहेत. किल्ल्याला एकूण २८ बुरूज असून या बुरूजावरून समुद्राचे सौंदर्य न्याहाळता येते. परकोट किल्ल्यात काही विहिर, गुहा आणि पाषाणस्तंभ आहेत.
बालेकिल्ल्यातील तटबंदीच्या बाजूस कोठार बांधलेले आहे. त्याच्या बाजूस तबेले आहेत. मधल्या बाजूस गणपती मंदीर आहे. मध्यावर कचेरीची इमारत आणि निवासस्थानाचे अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्यात विहिरीद्वारे पाण्याची व्यवस्था केलेली आढळते. किल्ल्याच्या बुरुजावरून संपूर्ण खाडीचा परिसर दृष्टीपथास पडतो. किल्ल्याच्या संरक्षणाच्यादृष्टीने सर्व प्रकारची काळजी किल्ला उभारतांना घेतलेली किल्ल्याच्या बांधणीवरून जाणवते. जयगड किल्ल्याच्या दरवाजापर्यंत वाहन पोहचते.
किल्ल्याच्या बाजूस असलेल्या जयगड बंदराचा उपयोग व्यापाराच्यादृष्टीने पूर्वीपासूनच केला जात आहे. किल्ल्यापासून पाच किलोमीटर अंतरावर कऱ्हाटेश्वर मंदिर आहे. वाहन थेट मंदिरापर्यंत जाते. समुद्र किनाऱ्यावरील एक मोठ्या खडकावर हे मंदिर उभारण्यात आले आहे. समुद्राच्या बाजूचा उंच कडा पाहतांना थरारक अनुभव येतो. मंदिराच्या खालच्या बाजूस गोमुखातून अखंड वाहणारा झरा आहे. रत्नागिरीहून गणपतीपुळमार्गे जयगडला जाता येते. हे अंतर ४६ किलोमीटर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून निवळीमार्गे जयगडला भेट देता येते.

Jaigad Fort (Marathi: जयगड किल्ला ) (Also transliterated as Zyghur in old British records.) https://www.youtube.com/watch?v=ubAs6-LFskM
Courtesy Internet
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!