उरलेल्या अन्नाचा सदूपयोग

कोणत्याही कारणाने असो, पण अन्नाची नासाडी करणार्‍यांनी दोन गोष्टी आवर्जुन लक्षात घेतल्या पाहिजेत. एक म्हणजे आपल्या देशात आज ही कोट्यावधी जनता ही अर्धपोटी किंवा चक्क उपाशी झोपत असते आणि आजही या देशात कुपोषणाने दरवर्षी हजारो बालकांचा जीव जात असतो. “अन्नासाठी दाहीदिशा, आम्हा फिरविशी जगदिशा” असे अन्नासाठी भटकणार्‍यांची संख्या या देशात प्रचंड आहे. दुसरी लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे, आपण शिजविलेले अन्न जेव्हा वाया घालवितो. तेव्हा या अन्नासोबतच आपण हे अन्नपदार्थ शिजविण्यासाठी अथवा बनविण्यासाठी तेल, तूप, मीठ, मसाले, गॅस, वीज,पाणी, पैसा, परिश्रम, वाहतुकीचा खर्च, साठवणुकीचा खर्च अशा अनेक वस्तू, सेवा व संसाधनाचीही नासाडी करीत असतो. अन्नाची नासाडी करणे हे सामाजिक दृष्ट्या अनैतिक आहे, आणि अन्नाचा अनादर करणे हा अधर्म आहे. उरलेल्या अन्नाचा सदूपयोग एवीतेवी हे प्रत्येक गृहिणीला अनुभवाने छान येत असतं. मला माहिती असलेल्या आणि नेहेमी करत असलेल्या रेसिपी खालील प्रमाणे

 शिळ्या भाताचे पदार्थ

फोडणीचा भात

हा घराघरात बनणारा पदार्थ असल्याने त्याबद्दल फारसे लिहिण्याची गरज वाटत नाही. पण उरलेल्या भातातून साधा कांदा-मिरची घालून फोडणी घातलेला, लेमन राइस, कर्ड राईस, दक्षिणेत करतात तसा चिवडा फोडणी घालतात तसा डाळ्या, शेंगदाणे गोडलिंब(कडीपत्ता) घालून केलेला भात, रावण भात, मेतकुट भात, चिंचेचा कोळ घालून केलेला फोडणीचा भात, मसाले भात, भाज्या घालून केलेला पुलाव असा कुठलाही भात करता येतो. अपनी अपनी चोइस.

 पराठे

उरलेला भात किंवा खिचडी परातीत काढून त्यात कणिक(पाणी न घालता पीठ भिजवायला आवश्यक आहे तेवढी), ओवा, तिखट, मीठ, धने-जिरं पूड आणि आवडेल तो मसाला घालून,कोथिंबीर किंवा कसुरी मेथी पेरून हाताने भात mash करत पोळ्यांना भिजवतो तसे भिजवायचे. मग मध्ये तेल लावून त्रिकोणी किंवा साधे पराठे लाटून तव्यावर दोन्ही बाजूने तेल सोडून छान खरपूस भाजून घ्यायचे. लोणची, चटणी, सॉस किंवा अगदी असाच रोल करून मुलांना वाढायचे अतिशय चविष्ट मुलांना आवडणारा पराठा तयार.

राईसबॉल

उरलेला भात किंवा खिचडी परातीत घेऊन त्यात हवे ते सगळे मसाले टाकायचे किंवा नुसतेच थोडे मीठ घालून तांदळाच पीठ घालून mash करून भिजवून घ्यायचे. सारणासाठी दोन बटाटे उकडून घेऊन त्यात आवडेल तेवढे चीज किसून घालायचे थोड तिखट अन मीठ घालून कोथिंबीर घालून मिक्स करायचे. एका पसरट वाटीत मैदा आणि कॉर्नफ्लोर घालून मिश्रण तयार करायचे. कढाईत तेल ओतून ते गरम करायला ठेवायचे. आता हाताला पाणी लावून लाडवाच्या आकाराचे भाताचे गोल गोळे तयार करायचे ते तयार करतांना त्यात फक्त एक टेबलस्पून सारण भरायचं. सगळे गोळे तयार झालेत कि मैद्याच्या मिश्रणात बुडवून तेलातून ब्राउन होईपर्यंत तळून काढायचे. अंडी खाणाऱ्यांनी मैदा मिश्रणाऐवजी फेटलेली अंडी वापरली तरी चालेल. हे राईसबॉल आवडेल त्या सॉस बरोबर खायला द्या किंवा मुलांच्या डब्यात देत येतील.

भाताचे कानुले

भात परातीत घेऊन त्यात तांदळाचे पीठ, अर्धा वाटी तीळ, मीठ थोडी साखर, लिंबाचा रस घालून पीठ भिजवतात तसे भिजवायचे. मग हाताला तेल लावून कुरकुरे असतात तसे लाम्बोळके (किंवा आवडेल त्या आकारात) कानुले तयार करायचे हे ईडली पात्रातून दहा मिनिट वाफवून घ्यायचे. त्यानंतर कढई gas वर ठेवून त्यात जिरं मोहरीची फोडणी करून त्यात हे कानुले टाकायचे आणि छान खरपूस होईस्तोर परतवून घ्यायचे. वाढतांना वरून कोथिंबीर आणि किसलेले खोबरे पेरून द्यायचे.

कटलेट

भात एका पसरट भांड्यात घेऊन त्यात घरी असतील नसतील तेवढ्या सगळ्या भाज्या (कोबी, गाजर, फुलकोभी, बीट, दुधी, भोपळा, पालक) धुऊन किसून घालायच्या, न्युट्रीला चंक्स उकळत्या पाण्यातून काढून बारीक करून घालायचा, दोन उकडलेले बटाटे mash करून, हे सगळे जिन्नस एकजीव होईपर्यंत मिळवायचे आणि कटलेटला आकार देऊन ब्रेडक्रम्स किंवा रव्यात घोळवून ब्राऊन रंगात तळून काढायचे.

 शिळ्या पोळ्या/चपात्या पदार्थ

पोळ्यांचा पास्ता 

कांदा परतून चिंचेचा कोळ किंवा टोमाटो घालून परतवून आवडेल तसे सगळे मसाले (तिखट, मीठ, हळद सांबर मसाला, गरम मसाला, गुळ) घालून गोड-आंबट किंवा आवडेल त्या चवीच्या फोडणीत पाणी घालून उकळू द्यायचे. दोनेक मिनिट चांगले उकळले कि त्यात पोळ्यांचे (जरा मोठ्या आकारात केलेले) तुकडे घालायचे. एक उकळी घेऊन लगेच बंद करायचे. कोथिंबीर पेरून तसेच गरम गरम खायला घ्यायचे.

हा पास्ता चाइनिज सॉसेस (सोया सॉस, चिली सॉस, विनेगर, शेजवान सॉस) आणि भाज्या (पातीचा कांदा, कोबी, सिमला मिरची, गाजर, फ्रेंचबिन्स, लसूण, आलं किसलेलं) वापरूनही करता येईल….. किंवा पास्ता करतात त्या पद्धतीने फक्त पोळ्यांचे तुकडे पाण्यात फार उकडू द्यायचे नाहीत तेवढी काळजी घ्यायची.

वड्या (नेमके नाव माहिती नाही)

कमीत कमी ४-५ उरलेल्या किंवा ताज्या पोळ्या हव्यात. दीड वाटी बेसन, दोन छोटे चमचे चिंचेचा कोळ, थोडा ओवा, अर्धा चमचा आल-लसूण पेस्ट, तिखट, मीठ, हळद, जिरे-धने पूड, साखर आवडीनुसार. कसुरी मेथी किंवा कोथिंबीर. पोळ्या सोडून इतर सगळे जिन्नस एकत्र करून अगदी थोडं थोडं पाणी घालून भज्यांसाठी भिजवतात तेवढे सैलसर बेसन भिजवून घ्यायचे. आता एक पोळी खाली ठेवून त्यावर मिश्रण पसरवावे (यावर हवे तर पनीर, चीज किंवा बारीक किसलेल्या भाज्या वरून पेरू शकता) त्यावर दुसरी पोळी ठेवून पुन्हा त्यावर मिश्रण पसरवावे त्यावर पुन्हा पोळी ठेवून मिश्रण असे ४-५ पोळ्यांची लेयर तयार करायची. आता सगळं एकत्र नीट पकडून रोल करायचा आणि तो अलगद ओल्या केलेल्या (धुतलेल्या) धाग्याने बांधायचे. हा रोल कुकरमध्ये डब्यात ठेवून वाफ्वायचा. कुकर मधून काढला कि त्याचे छान गोल गोल काप करायचे आणि ब्रावून रंग येईपर्यंत कुरकुरीत तळून घ्यायचे. धोप्याच्या/अळूच्या पानांची वडी आठवली असेल. अगदी तसेच करायचे आहे. सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यासाठी हमखास आवडेल असा पदार्थ तयार.

चकल्या

उरलेल्या सगळ्या पोळ्या मिक्सर मधून नीट बारीक करून घ्यायचे हे पीठ परातीत घेऊन यात पाऊन वाटी तांदळाचे पीठ, आल-लसूण पेस्ट, तिखट, मीठ,हळद ओवा-तीळ आणि दोन चमचे दही घालायचे. एरवी चकल्या करतांना घालतात त्याहून कमी मोहन (कडकडीत गरम केलेले) या पिठात घालायचे आणि थोडे थोडे पाणी घालून मळून घ्यायचे. चकल्या वळून खरपूस तळून घ्यायच्या. या चकल्या भजनी पिठाच्या नाहीयेत हे सांगितले नाहीतर ओळखायला येत नाही. छान जमल्या तर अत्यंत चविष्ट लागतात. सणवार नसतांना इच्छा झाल्यास गरम गरम करता येणारा झटपट खाता येणारा प्रकार.

 चुरमा 

पोळ्या मिक्सर मधून रवाळ पीठ होईपर्यंत बारीक करायचे. कढाईत थोडे तूप घालून जरा भाजून थोडे थंड झाले कि साखर मिसळायची.

लाडू 

पोळ्यांचे बारीक तुकडे करून त्यात मुक्तहस्ते तूप घालावे आणि चवीनुसार किसलेला गुळ सगळं एकजीव करून लाडू बांधावा. मधल्या वेळेत मुलांना द्यायला चटकन तयार होणारा पौष्टिक पदार्थ तयार.
हाच लाडू पोळी मिक्सर मधून बारीक करून तुपावर भाजून भाजतांनाच गुळ घालून करता येतो.

कुरकुरीत पापड 

अगदीच दोनेक पोळ्या उरल्या असतील तर संध्याकाळची भाजी फोडणी घालण्याआधी कढाईत घेतलेल्या तेलात पोळ्या चार सहा तुकड्यात मोडून पापडासारखे कुरकुरीत तळून घ्यावे. वरून चाट मसाला शिंपडून मुलांना खायला द्या किंवा चहाबरोबर खायला घ्या.

खाकरा 

उरलेली पोळी गरम तव्यावर ठेवून कापडाने दाबत फिरवत कडक होईपर्यंत दोन्ही बाजूने भाजून घ्यायची. हा तयार खाकरा चहाबरोबर किंवा मधल्या वेळेत तूप लावून लसुन चटणी बरोबर खायला घ्यायचा.

 

Click the link below to be on our #whatsapp #group for updates on #Offers / #Freebies / #Food #Knowledge / #Recipes much more… https://chat.whatsapp.com/KYX5wuHoHyt2B4t5n4z4d9

संदर्भ इंटरनेट

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *