करवंद (CARISSA CARANDAS)

करवंद या फळाला आपल्याकडे “रानमेवा’ असेही म्हटले जाते. काळी मैना’ म्हणून प्रसिद्ध असलेलं हे डोंगरी फळं काटेरी झुडुपात वाढतं. फळं कच्ची असताना ती आंबट-तुरट चवीची असतात. पिकल्यावर गोड आणि किंचित तुरट लागतात. आंब्याप्रमाणेच उन्हाळा हा या फळांचा ऋतू आहे. कच्ची करवंद रक्तपित्तावर गुणकारी समजली जातात. पिकलेली फळं खाल्ल्याने तहान भागते. पचायला हलकी आणि तोंडाला चव आणणारं हे फळ आहे. मलावरोधावर गुणकारी ठरतात. अत्यंत स्वस्त व तितकीच आरोग्यदायी अशी ही फळे आहेत. करवंदांपैकी फक्त पाच ते दहा टक्के फळे खाण्यासाठी वापरली जातात. सुमारे ९० ते ९५ % फळे वाया जातात. शहरातील लहान मुले करवंद खाणे विसरत चालली आहेत ही खेदाची बाब आहे. करवंदाचा काळा गडद रंग हा त्यातील रंग प्रदान करणाऱ्या आरोग्यदायी फायटेकिमीकलमुळे आहे. करवंदामधे बेरी वर्गातील फळांचे सर्व गुणधर्म आहेत. आधुनिक जीवनपद्धतीतून निर्माण होणाऱ्या बहुतेक विकारांवर (हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तआदाब, गाऊट, स्थौल्य इ.) करवंद हे पथ्यकारक आहे.

करवंदाचे काही पदार्थ

कच्च्या करवंदाची चटणी (टिकाऊ) प्रकार १

साहित्य: ४ कप कच्ची करवंदे ,वेलची, दालचिनी, मिरची पूड, आले, कांदा आणि लसूण, सोडिअम बेंझोएट, साखर आणि मीठ.

कृती. कच्ची करवंदे देठ काढून स्वच्छ धुऊन घ्यावीत. करवंद 1:1.5 प्रमाणात पाणी घालून फुटेपर्यंत शिजवावीत आणि चाळणीच्या साह्याने त्याचा गर काढून घ्यावा. चटणीसाठी खालील प्रमाणात साहित्य वापरावे. सर्वप्रथम करवंदाच्या गरात साखर आणि मीठ मिसळून मिश्रण उकळत ठेवावे. त्यानंतर वेलची, दालचिनी, मिरची पूड, आले, कांदा आणि लसूण मलमलच्या कापडात बांधून ती पुरचुंडी उकळत ठेवलेल्या मिश्रणात सोडावी व मिश्रण ढवळत राहावे. मिश्रण जॅमप्रमाणे घट्ट झाल्यावर मसाल्याची पुरचुंडी पिळून घ्यावी. नंतर मिश्रणात व्हिनेगार टाकून ते थोडा वेळ उकळू द्यावे. चटणी अधिक काळ टिकण्यासाठी २५० मिलिग्रॅम सोडिअम बेंझोएट प्रति किलो चटणीत मिसळावे. चटणी गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या बाटलीत भरावी व बाटल्यांना झाकण लावून त्या थंड व कोरड्या ठिकाणी ठेवाव्यात.

करवंद चटणी प्रकार २

साहित्य: खोवलेला ताजा नारळ – १/४  कप कच्ची करवंदे – १/४  कप हिरव्या मिरच्या- २ लसूण पाकळ्या- २ आले- १/४  इंच तुकडा चिरलेली ताजी कोथिंबीर – २ टेबलस्पून साखर- एक चिमूटभर मीठ, चवीनुसार पाणी आवश्यकतेनुसार

कृती: गॅसवर मिरच्या थोड्याश्या भाजून घ्याव्यात. (नाही भाजल्या तरी चालतील पण भाजल्यामुळे चटणीला खमंगपणा येतो. )  वरील सर्व साहित्य एकत्र करा आणि वाटून घ्या. (पाट्यावर वाटलेली चटणी फारच मस्त लागते.)

टीप: चटणीला चांगली चव हवी असेल तर फ्रोझन खोबरे वापरू नका, ताजे साहित्य वापरा.करवंदा ऐवजी कैरी वापरून पण अशीच चटणी करता येते. दोन्ही फळे उन्हाळ्यात उपलब्ध असतात. पण दोन्ही चटणीची चव वेगळी लागते.

कच्च्या करवंदाचे लोणचे (टिकाऊ) प्रकार १

साहित्य. कच्ची करवंदे, मीठ, हळद, मेथी, हिंग, मोहरी, सोडिअम बेंझोएट, तेल.

कृती. ताजी कच्ची करवंदे देठ काढून तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. लोणच्यासाठी पुढील प्रमाणात साहित्य वापरावे.  सर्व प्रथम निम्मे मीठ आणि हळद लावून ती स्टीलच्या पातेल्यात दोन ते तीन तास ठेवावीत. त्यामुळे करवंदातील पाणी बऱ्याच अंशी निचरून जाते. तेल घेऊन त्यात मेथी, हिंग, मोहरी वापरून फोडणी तयार करावी आणि ही फोडणी अंगचे पाणी निचरलेल्या करवंदामध्ये मिसळावी व नंतर उरलेले मीठ, हळद व तिखट मिसळावे. लोणच्यात एक किलोस २५० मिलिग्रॅम या प्रमाणात सोडिअम बेंझोएट मिसळून लोणचे बाटलीत भरल्यानंतर शिल्लक राहिलेले आणि उकळून थंड केलेले तेल बाटलीत ओतावे. तेलाची पातळी लोणच्यावर राहील याची काळजी घ्या. बाटल्या झाकण लावून बंद कराव्यात आणि थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात.

करवंदाचे लोणचे प्रकार २

साहित्य. दोन वाट्या कच्ची करवंदे, दोन चमचे लोणच्याचा मसाला, अर्धा चमचा खायचा सोडा, तेल, मीठ, चवीनुसार साखर.

कृती. कच्ची करवंदे देढ काढून कोमट पाण्यात सोडा घालून भिजवून ठेवावीत. थोड्या वेळानी दोनदा चोळून धुवावीत म्हणजे चीक जातो. करवंदे पुसून घ्यावीत. हळद, मीठ, लोणच्याचा मसाला घालून मिसळावे. तीन चमचे तेलाची मोहरी, जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. गार फोडणी लोणच्यावर घालावी. चवीला साखर घालावी. लोणचे लौकर संपवावे. फार टिकत नाही.

कच्च्या करवंदाचा जॅम

कच्ची करवंदे देठ काढून तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर 1:1.5 या प्रमाणात करवंद आणि पाणी घेऊन करवंदे चांगली शिजवावीत. शिजलेली करवंदे हाताने कुस्करून ती एक मि.मी.च्या स्टेनलेस स्टील चाळणीतून त्याचा गर वेगळा करावा. नंतर एक किलो गरामध्ये एक किलो साखर आणि दोन ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून मिश्रण पेजेप्रमाणे घट्ट होईपर्यंत उकळावे. जॅममध्ये २५० मिलिग्रॅम पोटॅशिअम मेटाबायस्फाईट प्रति किलो जॅम या प्रमाणात मिसळून जॅम गरम असतानाच रुंद तोंडाच्या निर्जंतुक केलेल्या बाटल्यांत भरावा. बाटल्या बंद करून थंड आणि कोरड्या जागी ठेवाव्यात.

कच्च्या करवंदाची जेली

कच्च्या करवंदाची जेली करण्यासाठी करवंदे व पाणी 1:1.5 प्रमाणात घेऊन फुटेपर्यंत शिजवावीत. करवंदे शिजल्यानंतर करवंदात निव्वळ रस कापडातून गाळून घ्यावा. नंतर करवंदाच्या रसात 1:3/4 या प्रमाणात साखर मिसळून मिश्रण घट्ट होईपर्यंत उकळावे. अशाप्रकारे तयार झालेली जेली गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या बाटलीत भरावी.

पिकलेल्या करवंदाचे सिरप :

पिकलेल्या करवंदांपासून सिरप तयार करण्यासाठी सर्वप्रथम पूर्ण पिकलेली, ताजी, रसरशीत करवंदे निवडून पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर करवंदे न शिजवता चाळणीवरून घासून त्यापासून रस काढावा. नंतर एक किलो रसामध्ये दोन किलो साखर टाकून एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाणे 68.5 टक्के करावे. त्याचप्रमाणे सिरपमध्ये सायट्रिक आम्ल टाकून सिरपची आम्लता 1.5 टक्का ठेवावी. निर्जंतुक केलेल्या बाटल्यांत सिरप भरून बाटल्या थंड व कोरड्या ठिकाणी ठेवाव्यात.

कच्या करवंदाचे लोणचे.

साहित्य. कच्ची करवंदे – २ कप, तयार कैरी लोणचे मसाला-  १२ ते १५ टिस्पून, मीठ चवीनुसार, हळद- १/२  टिस्पून, हिंग- १/२ टिस्पून, तेल- १० ते १२  टेबलस्पून.

कृती. करवंदांची देठे काढून टाका आणि स्वच्छ धुवा. चाळणीत थोडा वेळ निथळू द्या, नंतर फडक्याने पुसून कोरडी  करा. एक-एक करवंद घेऊन हळूच ठेचा. (करवंद फक्त फुटले पाहिजे, चेंदा-मेंदा करू नका.) ठेचलेली करवंदे  काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या वाडग्यात घेऊन त्यांना ४ टीस्पून मीठ चोळा व रात्रभर तशीच झाकून ठेवा. (यामुळे करवंदांचा चीक जाईल आणि ती मऊ पण होतील.) दुसऱ्या दिवशी करवंदे दाबुन त्यांच्या आतील बिया बाहेर काढा. एखाद-दुसरी बी राहिली तरी काही हरकत नाही, खाताना काढता येते. (तुम्हाला हे काम किचकट वाटत असेल तर ठेचण्याऐवजी करवंदाचे दोन भाग करून आतील बिया काढा. मीठ लाऊन रात्रभर झाकून ठेवा.)

करवंदांना जर सकाळी पाणी सुटले असेल तर ते काढून टाका. हलक्या हाताने दाबलीत तरी चालतील.) आता त्यात लोणचे मसाला, हळद आणि १ टिस्पून मिठ घालावे. चांगले मिक्स करावे.

तेल वाफ/धूर येईपर्यंत गरम करावे. गॅस बंद करून तेल जरा थंड झाल्यावर त्यात हिंग घालून फोडणी तयार करावी. जळवून देऊ नये. तेल थंड झाल्यावर ही फोडणी वाडग्यात घालून निट मिक्स करावे.

स्वच्छ, सुक्या व हवाबंद काचेच्या बरणीत भरून ठेवावे. लोणचे बरणीत भरल्यावर वर तेलाचा थर हवा नाहीतर बुरशी येते. (तेल कमी पडल्यास तेल वाढवावे. कच्चे तेल लोणच्यात कधीही घालू नये. तेल गरम करून थंड झाल्यावरच लोणच्यात टाकावे.) अंदाजे ८ ते १० दिवसात लोणचे मुरते.

लोणचे मुरल्यावर फ्रिझमध्ये ठेवलेत तर जास्त काळ टिकेल. नको असल्यास वरचे तेल काढून टाका.

करवंदामध्ये असणारे औषधी गुणधर्म

  • करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचाविकारामध्ये करवंद सेवनाचा फायदा दिसून येतो.
  • करवंद हा रानमेवा आहे, तो नैसर्गिकरित्या उपलब्ध झालेला असल्यामुळे याच्या सेवनाने दुष्परिणाम होत नाहीच. जर रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर रोज मूठभर करवंदे खावीत. याने रक्ताची कमतरता नक्कीच भरून येईल.
  • करवंदामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.
  • करवंदामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक अ‍ॅसिड असल्यामुळे उष्णतेमुळे होणारे विकार करवंद सेवनाने कमी होतात.
  • उन्हाचा त्रास होत असेल यामुळे, शरीराचा दाह होत असेल, तर करवंदाचे सरबत करून प्यावे.
  • करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मलावष्टंभाचा त्रास कमी होतो.
  • अरुची, मळमळ, उलटी या विकारांमध्ये करवंदे अत्यंत गुणकारी आहेत.
  • आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होत असेल तर करवंदाचे सरबत थोड्याथोड्या अंतराने पीत राहावे, काही वेळाने आराम वाटतो.
  • करवंदाची पाने हीदेखील औषधी गुणधर्माने युक्त आहेत. ही पाने मधामध्ये बारीक करून खाल्ल्यास कोरडा खोकला नाहीसा होतो.
  • करवंदामध्ये कॅल्शिअमही भरपूर प्रमाणात असते.

 

संजीव वेलणकर 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *