फणस

सध्या फणसाचा सीझन चालू आहे. मार्चच्या मध्यापासून बाजारात फणस दिसायला सुरवात होते. अगदी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा हंगाम चालतो. पिकलेला फणस शीतल, स्निग्ध, तृप्तीदायक, मधुर गुणात्मक, मांसवर्धक व बलदायक असतो. फणसाला हिंदीत ‘कठहल’, तेलगु आणि ओरिसामध्ये ‘पनस’, इंग्रजीत ‘जॅकफुट्र’ अशी नावं आहेत. फणसाचे गर व आठळ्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, कॅरोटिन, थायमीन रिबोफ्लेविन, नायसिन व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते तसेच प्रथिने, मेद, खनिजे, आद्र्रता, तंतुमय, पिष्टमय पदार्थही असतात. या सर्व गुणधर्मामुळे शरीर संवर्धनासाठी, पचनशक्ती वाढविण्यासाठी फणसाचा उपयोग होतो.

बरका व कापा फणस अशा त्याच्या दोन जाती आहेत. कापा प्रकारात मधुर चविष्ट व कडक गरे आढळतात व हे गरे पिवळ्या रंगाचे असतात तर बरकामध्ये गोड व लिबलिबीत नरम व पांढरे गरे आढळतात. याशिवाय विलायती फणस अशी फणसाची आणखी एक जात असून हा फणस प्रामुख्याने भाजीसाठी वापरला जातो. फणसाचे गरे व आठळे दोन्हीमध्येही औषधी गुणधर्म आहेत.

 • फणसाचे गरे सुकवून नंतर त्याचे दळून पीठ करून त्याची पातळ पोळी किंवा पुरी बनविल्यास वर्षभर फणसाचा आस्वाद घेता येतो.
 • लहान मुलांना ही फणसाची पोळी खाण्यास द्यावी, यामुळे त्यांच्या शरीराची वाढ चांगली होते.
 • फणसांच्या गऱ्याची खीर व कढीही उत्कृष्ट होते. तसेच फणसापासून जाम, जेली, मुरंबा तयार करता येतो. हे सर्व पदार्थ लहान मुलांना आवडतात म्हणून या सर्व पदार्थाचा आहारामध्ये समावेश करावा. कच्च्या फणसाची भाजी बनवावी तसेच आठळ्या ओल्या असताना त्यांची भाजी बनवावी किंवा वाफवून आंब्याच्या कोयीप्रमाणे खावीत.
 • फणसाची बी सुकवून दळून त्याचे पीठ बनवावे व या पिठाचा वापर भाजीत, आमटीत रश्श्यासाठी करावा किंवा त्याची थालिपीठे बनवावीत. हे अत्यंत पौष्टिक असल्याने अशक्तपणा, जुना ताप, कृशव्यक्ती यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आठळीच्या पिठाचा वापर करावा. आठळीच्या पिठापासून खीरही बनविता येते. रुग्णांसाठी खीर बनवून तिचा वापर करावा.
 • फसणाचे गरे, लहान मुलांच्या शक्तीप्रमाणे खाण्यास द्यावे. त्यांची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होण्यासाठी याचा उपयोग होतो.
 • फणसाची मुळे अतिसारावर उपयोगी पडतात.
 • फणसाची आठळी भाजून खावी. ही फार चविष्ट व पौष्टिक असते. म्हणून शरीर दणकट व बलवान होण्यासाठी तिचा वापर करावा.
 • सांधे दुखत असतील तर फणसाच्या कोवळ्या पानांनी शेकावीत, यामुळे सांध्यावरची सूज कमी होऊन आराम मिळतो.
 • फणसाचा चीक शरीरावर जर बेंड आले असेल तर उपयोगी पडतो. या चिकामुळे बेंडाची सूज नाहीशी होऊन ते पिकते व त्यात असणाऱ्या ‘पू’चा निचरा होतो.
 • कृशव्यक्तींनी वजन वाढविण्यासाठी रोज ७-८ फणसाचे गरे खावेत किंवा त्याच्या आठळ्याची खीर करून खावी.

 

फणस हे पौष्टिक असल्याकारणाने ते शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी चांगले आहे, परंतु फार गरे खाल्ल्यास त्यामध्ये असणाऱ्या एन्झाइममध्ये अपचन होऊन जुलाब होतात. म्हणून सहसा फणस जेवण झाल्यावर खाऊ नये. फणसाचे गरे खाल्ल्यानंतर त्यावर नागवेलीचे पान खाल्यास पोट फुगते व खूप त्रास होतो. अशा वेळी िलबूपाणी प्यावे. त्यामुळे पोटफुगी कमी होते. पोट जास्त भरलेले नसताना मधासोबत गरे खाल्ल्यास बाधत नाहीत. फणसा नंतर पान खाणे हानिकारक असते. फणसामध्ये कोणत्याही प्रकारची साखर नसल्यामुळे मधुमेह झालेल्यांसाठी महत्त्वाचे फळ आहे.

फणसातील पोषणद्रव्यांमध्ये कर्करोग विरोधी, क्षरण विरोधी आणि अल्सर विरोधी घटक असल्यामुळे अनेक रोगांवर गुणकारी आहे. फणसाच्या साकटाची, पावाची, आठळ्यांची आणि कच्च्या ग-याची भाजी केली जाते. याचबरोबर फणसापासून फणस पोळी, तळलेले गरे आणि सांजणे केले जातात.

काही फणसापासून केलेले पदार्थ.

फणसाचे सुसेल

साहित्य. कोवळा फणस, चार हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी ओले खोबरे, एक चमचा भिजवलेले काळे वाटाणे, थोडी चिंच, चवीपुरता गूळ, मीठ, फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी, कोथिंबीर चिरून.

कृती. फणस व्यवस्थित चिरून घ्यावा. वरची साल व आतील दांडा काढून टाकावा. फणसाच्या उभ्या फोडी करून कुकरमध्ये शिजवून घ्याव्यात. गार झाल्यावर हाताने चांगले कुस्करून घ्यावे. एका पॅनमध्ये तेल घालून मोहरी-हिंगाची फोडणी करावी व वाटाणे घालून झाकावे. वाटाणे उडू लागतात. मग त्यात भाजी घालावी.  खोबरे व मिरची वाटून घालावे. चवीपुरता गूळ व मीठ घालावे. ढवळून, झाकून एक वाफ आणावी वरून कोथिंबीर घालावी.

फणसाची सुकी भाजी

साहित्य. कोवळा फणस, एक चमचा भिजवलेली तुरीची डाळ, पाच-सहा लसूण पाकळ्या ठेचून, एक चमचा ओले खोबरे, दोन-तीन हिरव्या मिरच्या चिरून, हळद, मीठ, तेल.

कृती. फणसाची साल व आतील दांडा काढून फणस बारीक चिरून घ्यावा. कढईत तेल घालून त्यात लसूण, हिरव्या मिरच्या घालाव्या. त्यात भिजवलेली तुरीची डाळ घालावी व थोडे पाणी घालावे. त्यात भाजी घालून झाकणीवर पाणी ठेवून भाजी शिजू द्यावी. भाजी शिजल्यावर हळद, मीठ व खोबरे घालावे. भाकरी किंवा पोळीसोबत ही भाजी छान लागते.

फणसाचे दबदबीत

साहित्य. कोवळा फणस, अर्धी वाटी तुरीची डाळ, दोन चमचे मिरची पावडर, पाव चमचा हळद, थोडी चिंच, अर्धी वाटी ओले खोबरे, पाच-सहा त्रिफळे, एक चमचा खोबरेल तेल, मीठ.

कृती. फणसाची साल व आतील दांडा काढून मध्यम आकाराच्या फोडी करून घ्याव्यात. तुरीची डाळ व फणस कुकरमध्ये शिजवून घ्यावे. खोबरे, मिरची पावडर, हळद, चिंच हा मसाला वाटून घ्यावा. त्यात त्रिफळे ठेचून घालावेत. शिजवलेली डाळ व फणसाच्या फोडी एकत्र करून त्यात मसाला घालून शिजत ठेवावे. मीठ घालून चांगले उकळल्यावर खोबरेल तेल घालून खाली उतरवावे.

फणसाची बिर्याणी

साहित्य. दोन वाट्या तांदूळ, दोन वाट्या कच्च्या कोवळ्या फणसाच्या फोडी, दोन चमचे तूप, एक चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, दोन तमालपत्र, दोन मोठे कांदे व टोमॅटो, मीठ, तेल

 • गरम मसाला एक मोठा चमचा धने, प्रत्येकी एक छोटा चमचा जिरे व बडीशेप, तीन लवंगा, चार-पाच काळे मिरे, एक वेलची, एक इंच दालचिनी हे सर्व भाजून त्याची पावडर करावी.
 • वाटायचा मसाला एक इंच आले, सहा लसूण पाकळ्या, एक हिरवी मिरची, एक मोठा चमचा कोथिंबीर हे सर्व मिक्स रवर वाटून घ्यावे. टोमॅटोसुद्धा चिरून वाटून घ्यावेत. कांदे उभे चिरून घ्यावेत. फणसाच्या फोडींना थोडे मीठ लावून ठेवावे.

कृती. तांदूळ अर्धा तास आधी धुवून ठेवावेत. कढईत तेल घालून गरम झाल्यावर फणसाच्या फोडी सोनेरी रंगावर तळून बाजूला ठेवाव्यात. कढईत तूप घालून तमालपत्र घालावे. मग तांदूळ घालून परतून घ्यावे. चार वाट्या कढत पाणी घालून कुकरमध्ये भात शिजवून घ्यावा. कढईत पुन्हा तूप घालून कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. मसाल्याची पावडर चाळून खमंग वास येईपर्यंत परतून वाटलेला मसाला घालून चांगले परतावे. मिरची पावडर, हळद, मीठ व तळलेल्या फणसाच्या फोडी घालून एकत्र करावे. त्यात तयार भात घालून एकत्र करून मंच आचेवर एक वाफ द्यावी. गॅसवरून खाली उतरवून वरून कोथिंबीर पेरावी.

जून फणसाच्या गरे-गोट्यांची भाजी

साहित्य. फणस चिरून आतील गरे व आठळ्या घ्याव्यात. गरे चिरून घ्यावे. आठळ्यांची वरची साले काढून त्या चिरून घ्याव्या. चार-पाच हिरव्या मिरच्या, हळद, अर्धी वाटी ओले खोबरे, दोन कांदे चिरून, मीठ, तेल.

कृती. कढईत तेल घालून कांदा घालावा. थोडे मीठही घालावे. कांदा लवकर नरम होतो. त्यात मिरच्या घालून, कांदा गुलाबी रंगावर आळा, की आठळ्या व थोडे पाणी घालावे. आठळ्या शिजल्या, की त्यात गरे घालून परतावे. झाकणीवर पाणी ठेवून शिजू द्यावे. गरे शिजल्यावर ओले खोबरे घालून सर्व्ह करावे.

फणसाचे चिप्स

साहित्य. जून फणसाचे गरे उभे चिरून कपड्यावर पसरून ठेवावे, एका छोट्या भांड्यात पाणी, मीठ, हळद घालून एकत्र करून घ्यावे, खोबरेल तेल.

कृती. कढईत तेल तापत ठेवावे. तेल गरम झाल्यावर थोडे चिप्स घालावे. अर्धवट तळल्यावर चमचाभर पाणी कढईत घालावे. चुर्रऽऽ असा आवाज होऊन गरे कडक झाल्यावर काढावे.

फणसाची इडली

साहित्य. रसाळ्या फणसाचे गरे, अर्धी वाटी ओले खोबरे, दोन वाटी तांदळाचा रवा, एक चमचा गव्हाचा रवा, चवीनुसार गूळ, तूप.

कृती. फणसाच्या गऱ्यातील आठळ्या काढून मिक्सअरवर वाटून रस चाळणीतून गाळून पाच वाटी रस घ्या. रसात तांदळाचा रवा, गव्हाचा रवा, चवीप्रमाणे गूळ, ओले खोबरे, किंचित मीठ घालून कालवून दोन ते तीन तास ठेवावे. इडली पात्रात तुपाचा हात फिरवून पळीने पीठ घालून इडल्या उकडून घ्याव्यात. आवडीच्या चटणीसोबत खायला तयार.

आंबा-अननस-फणसाची भाजी

साहित्य. २५0 ग्रॅम अर्धवट पिकलेले फणसाचे गरे, १ मध्यम अननस, २ रायवळ आंबे, १ वाटी खोबरं, ८-१0 काळी मिरी, हळद,लाल तिखट, १ टे.स्पू.किसलेला गूळ, मीठ, तेल आणि फोडणीचं साहित्य.

कृती. गर्या तील आठळ्या काढून  गर्यापचे प्रत्येकी चार काप करावे. अननसाची जाड साल व मधला दांडोरा काढून त्याच्या फोडी कराव्यात. आंब्याचा रस काढावा. खोबरे, मिरी, हळद आणि तिखट हे सर्व साहित्य एकत्र करून ते  जाडसर वाटावं. पातेल्यात तेल तापवून त्यात मिरी, हिंग आणि हळद घालून फोडणी करावी. त्यावर अननस आणि फणस घालून आंब्याचा रस घालावा. वाटण, मीठ आणि गूळ घालून भाजी शिजू द्यावी. ही भाजी लवकर शिजते. मिश्र फळांमुळे भाजीची वेगळीच चव लागते.

फणसाच्या गर्यांची भाकरी 

साहित्य. दोन वाटी फणसाचे (पिकलेले) गरे, २ वाटी तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ आणि अंदाजे दूध.

कृती. रसाळ फणसाच्या गर्या चा रस तयार करावा. (गर मिक्सरमधून काढून रस करावा.), त्यात चवीपुरतं मीठ घालावं. तांदळाच्या पिठात गर्यााचा रस आणि दूध घालून पीठ चांगलं मळावं आणि त्याची भाकरी करून भाजावी.

फणसाचं सांदण

साहित्य. ४ वाट्या तांदळाचा बारीक रवा, लहान फणसाचे पाव किलो (२५0 ग्रॅम) गरे, १ वाटी किसलेला गूळ, १ नारळाचा चव, थोडं  मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा.

कृती. गर्यांकच्या आठळ्या काढून गर्यांवचा मिक्सरमधून रस काढावा. नारळाचा चव,  गर्यांेचा रस, तांदळाचा रवा, गूळ, मीठ आणि सोडा सर्व एकत्र करून पीठ सैलसर भिजवावं. इडलीपात्राला तुपाचा हात फिरवून मिश्रण घालून सांदणे वाफवून घ्यावी. ती तुपाबरोबर खावी.

फणसाची कढी

साहित्य. ८-१0 काट्या फणसाचे गरे, ३ वाट्या दही, १ टे. स्पू. डाळीचं पीठ, आलं, हिरव्या-मिरच्या, तूप, हिंग, जिरे, हळद, साखर आणि मोहरी.

कृती. फणसाच्या गर्यादचे मध्यम आकाराचे काप करावे. तुपात हिंग, मोहरी, जिरे, हळद आणि हिरव्या मिरचीची फोडणी करून त्यावर गरे घालावे. अर्धी वाटी पाणी घालून झाकण ठेवावं. गरे शिजू द्यावेत. मीठ टाकावं. मिरच्या आलं वाटून घ्यावं. दह्यात पाणी घालून घुसळून त्यात वाटलेलं मिश्रण घालून सारखं करावं. तयार मिश्रण शिजलेल्या गर्यां वर घालून चांगलं उकळलं की गॅस बंद करावा.

फणसाच्या पातोळ्या

साहित्य. ४ वाट्या बिया काढलेले फणसाचे गरे, दोन वाट्या तांदूळ, दोन वाट्या नारळाचा चव, चवीपुरता गूळ, मीठ आणि केळीची पानं.

कृती. तांदूळ व गरे बुडेल इतक्या पाण्यात पाच-सहा तास भिजत घालावे. नंतर मिक्सरवरून बारीक करावे. कढईत नारळाचा चव व गूळ मिक्स करून हे मिश्रण  परतावं आणि कोरडं करावं. केळीच्या पानाचे मध्यम तुकडे करून त्याच्यावर पीठ पसरावं. अध्र्या भागावर नारळाचं मिश्रण पसरवून पान दुमडून घ्यावं. अशा प्रकारे पानं तयार करून निर्लेपच्या तव्यावर झाकण ठेवून ते भाजून घ्यावं किंवा इडलीप्रमाणे वाफवून घ्यावं. गरमागरम पातोळ्या तुपाबरोबर खाल्ल्यास छान लागतात.

आठळ्या (फणसाच्या बिया) व चवळी मसाला

साहित्य. २०० ग्रॅम, आठळ्या, २०० ग्रॅम चवळी, १ कांदा, १ टोमॅटो, १ टी. स्पून प्रत्येकी धने जिरे पावडर, १/२ टे. स्पून. काश्मिरी मिरची पावडर, १ टी. स्पून गरम मसाला, पाणी (कोथिंबीर पाहिजे असल्यास) फोडणीसाठी मोहर, हिंग, कढीपत्ता, चवीपुरती साखर.

कृती. आठळ्यांचे तुकडे करून साल काढून उकडून घ्याव्या. चवळी रात्रभर भिजवून उकडून घ्यावी. कांदा, टोमॅटो बारीक कापून घ्यावे. लसूण पेस्ट करावी. चिंचेचा कोळ काढावा. प्रथम पॅन घेऊन गरम झाल्यावर तेल घालावे. त्यात फोडणीचे साहित्य घालून त्यावर लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, धनेजिरे पावडर घालून चांगले परतावे. त्यावर मीठ, चिंचकोळ, काश्मिरी मिरची पावडर, गरम मसाला, साखर घालून ढवळून घ्यावे. त्यावर आठळ्या व चवळी घालावी. थोडे पाणी घालावे. झाकण ठेवून चांगली उकळी येऊ द्यावी. पाच मिनिटे मंद गॅसवर ठेवून गॅस बंद करावा. फुलके, भाकरी, नान तसेच दोन पावांच्या मधे भरूनही खाऊ शकतो.

अननस फणसाची भाजी

साहित्य. सहा रायवड आंब्याची घोटं, अर्धा अननस, १२ कापा फणसाचे गरे, अर्धी वाटी खवलेला ओला नारळ, अर्धा चमचा मोहरी, एक चमचा तिखट, चवीसाठी गुळाचा खडा, मीठ, एक टेबलस्पून खोबरेल तेल, फोडणीसाठी िहग, मोहरी, कढिपत्ता

कृती. घोटांची साल काढून बाठे वेगळे ठेवणे. साल जरा पिळून घेऊन रस काढावा. पाऊण इंचाचे अननसाच तुकडे, दोन गऱ्यांचे तुकडे, खोबरे, मोहरी व तिखट यांचे जरा जाडसर वाटण तयार ठेवावे. फोडणी करून त्यात प्रथम आंब्याची घोटं रसासहित व अननसाचे तुकडे घालून शिजवावेत. चांगली वाफ आल्यावर तिखट, मोहरी घालून केलेले खोबऱ्याचे वाटण, गरे, गुळाचा खडा व मीठ घालून चांगले शिजवणे. वरून खोबरेल तेल घालून विस्तवावरून बाजूला करून ठेवा.

 

EVEN THOUGH IT’S THE NATIONAL FRUIT OF NEARBY JAMAICA, THIS FRUIT IS ILLEGAL IN THE STATES.

 

संजीव वेलणकर पुणे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *